Two thousand rupees should be deducted from the currency | "दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद कराव्यात"

"दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद कराव्यात"

नवी दिल्ली : दोन हजार रुपयांच्या नोटांची अनेकांनी साठवणूक केल्यामुळे सरकारने आणलेल्या या सर्व नोटा सध्या व्यवहारात नाहीत. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात याव्यात, असे मत माजी केंद्रीय अर्थ व्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी व्यक्त केले आहे.
नोटाबंदीला गेल्याच आठवड्यात तीन वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने सुभाष चंद्र गर्ग म्हणाले की, अर्थव्यवस्थेत कोणताही अडथळा येणार नाही, या पद्धतीने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढणे शक्य आहे. सध्या चलनात जी रक्कम आहे, त्यापैकी एक तृतीयांश रक्कम केवळ दोन हजार रुपयांच्या मूल्यामधील आहे, पण अनेकांनी त्या नोटा स्वत:कडे साठवून ठेवल्या आहेत.
त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा लोकांना आपापल्या खात्यात जमा करण्यास सांगावे. त्या बँकांच्या खिडक्यांवर बदलून देण्याचे कारण नाही. तसे केल्यास ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, ती मंडळीच सर्व नोटांच्या बदल्यात कमी मूल्याच्या नोटा स्वत:कडे घेतील आणि सामान्यांना मात्र नोटांची पुन्हा चणचण भासेल. तसे होता कामा नये. या आधी २0१६ साली ५00 व १000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या, तेव्हा लोकांना खूपच त्रास झाला होता.
>केंद्र सरकारने २0१६ साली ५00 व १000 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या, तेव्हाच २000 रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात छापल्या होत्या. सध्या चलनातील एकूण रकमेपैकी सहा लाख कोटी रुपये दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहेत. अनेक ठिकाणी, विशेषत: ग्रामीण भागांत लोकांना दोन हजार रुपयांच्या नोटांची मोड मिळताना अडचण येत आहे. पूर्वी ५00 व १000 रुपयांच्या नोटा ज्याप्रमाणे काही जणांनी साठवल्या, तसेच आता २000 रुपयांच्या नोटांचे होत आहे, असे माजी अर्थ सचिवांना वाटत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title:  Two thousand rupees should be deducted from the currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.