कोरोनाच्या काळात मंदावलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला वेग येऊ लागला आहे. रिअल इस्टेट कंपन्यांचे मोठे प्रकल्प लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. याचं ताजं उदाहरण म्हणजे ट्रम्प रेजिडेन्स. रिअल इस्टेट कंपन्या स्मार्टवर्ल्ड डेव्हलपर्स आणि ट्रायबेका डेव्हलपर्सनं गुरुग्राममधील 'ट्रम्प' ब्रँडच्या अल्ट्रा आलिशान निवासी प्रकल्पातील सर्व २९८ युनिट्स ३,२५० कोटी रुपयांना विकल्यात.
लाँचिंगच्या दिवशी गुरुग्राममध्ये ८ कोटी ते १५ कोटी रुपये किमतीच्या सर्व २९८ अल्ट्रा-लक्झरी युनिट्सची विक्री झाली आणि ३,२५० कोटी रुपयांचं बुकिंग झालं. या बुकिंगमध्ये १२५ कोटी रुपयांच्या पेंटहाऊसचादेखील समावेश आहे. गुरुग्रामच्या सेक्टर ६९ मध्ये असलेला हा प्रोजेक्ट ५१ मजली दोन टॉवर्समध्ये पसरलेला आहे. या प्रकल्पाचा विकास, बांधकाम आणि ग्राहक सेवेची देखरेख स्मार्टवर्ल्ड करणार आहे. ट्रायबेका डिझाइन, मार्केटिंग, सेल्स आणि क्वालिटी कंट्रोलची जबाबदारी सांभाळणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला स्मार्टवर्ल्ड आणि ट्रायबेकानं गुरुग्राम प्रकल्पासाठी २,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलं होतं. हा नवा प्रकल्प त्याचाच एक भाग आहे.
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
याच महिन्यात पहिल्या टॉवरचं पजेशन
दिल्ली एनसीआरमधील पहिल्या ट्रम्प टॉवरचा ताबा या महिन्यात मिळण्यास सुरुवात होईल, असंही बिल्डरनं जाहीर केलं आहे. हा प्रकल्प २०१८ मध्ये गुरुग्राममध्ये सुरू झाला. तोही पूर्णपणे विकला गेला आहे. "ट्रम्प रेसिडेन्सेसला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा जागतिक दर्जाचं जीवन जगण्याच्या भारताच्या इच्छेचा पुरावा आहे. स्मार्टवर्ल्डला हा खास प्रकल्प पूर्ण केल्याचा अभिमान आहे. आमच्या दृष्टीकोनावर विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही आमच्या खरेदीदारांचे आभार मानतो," असं स्मार्टवर्ल्ड डेव्हलपर्सचे संस्थापक पंकज बन्सल म्हणाले.
ट्रम्प आपला प्रकल्प पाहण्यासाठी येऊ शकतात
गुरुग्राम प्रकल्पाची प्रगती पाहण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर किंवा एरिक ट्रम्प येत्या काही महिन्यांत भारतात येऊ शकतात, असं कल्पेश मेहता यांनी नुकतंच या प्रकल्पाच्या शुभारंभावेळी सांगितलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चिरंजीव ट्रम्प ज्युनिअर यांनी २०१८ मध्ये आणि २०२२ मध्ये शेवटचा भारत दौरा केला होता.