Travelers will get insurance for 2 lakhs in only 90 paise | प्रवाशांना केवळ ४९ पैशांत मिळणार १० लाखांचा विमा
प्रवाशांना केवळ ४९ पैशांत मिळणार १० लाखांचा विमा

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांना अवघ्या ४९ पैशांत १० लाख रुपयांच्या विम्याचे संरक्षण देण्याची अनोखी योजना भारतीय रेल्वे प्रशासनाने आणली आहे. प्राप्त माहितीनुसार, इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझन कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) संकेतस्थळावरून तिकीट बुक केल्यास ‘प्रवासी विम्या’चा पर्याय प्रवाशांना मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एका ‘पीएनआर’अंतर्गत बुक केलेल्या सर्व तिकिटांवर ही विमा सुविधा मिळेल.
सूत्रांनी सांगितले की, आयआयसीटीसीच्या वेबसाईटवरून वा मोबाइलवरून तिकीट बुक करणाऱ्या भारतीय प्रवाशांना विम्याचा लाभ मिळेल. रेल्वे अपघात वा कोणत्याही अनुचित घटनेला यातून विमा संरक्षण मिळेल. मृत्यू, कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व, कायमस्वरूपी अंशत: अपंगत्व, जखमी झाल्यास रुग्णालयाचा खर्च आणि अपघातानंतर मृतदेह वाहून नेण्याचा खर्च यासाठी विमा संरक्षण असेल.
विम्याची सर्वोच्च मर्यादा १० लाख आहे. अपघातात वा अनुचित घटनेत प्रवाशाचा मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास संपूर्ण १० लाखांची भरपाई मिळेल. कायमस्वरूपी अंशत: अपंगत्वासाठी ७.५ लाखांची भरपाई, तर जखमींना २ लाखांचा उपचार खर्च मिळेल. उपचाराचा खर्च मृत्यू वा अपंगत्वाच्या संरक्षणाव्यतिरिक्त मिळेल.
>कसा काढायचा विमा?
विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रवाशांना रेल्वेचे तिकीट बुक करताना ‘प्रवासी विमा’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर प्रवाशांना विमा पॉलिसीबाबत एसएमएस आणि ई-मेल संदेश पाठविला जाईल. हा संदेश थेट विमा कंपनीकडून येईल.


Web Title: Travelers will get insurance for 2 lakhs in only 90 paise
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.