Submit a Survival Certificate by November 7th | ३० नोव्हेंबरपर्यंत हयात प्रमाणपत्र सादर करा

३० नोव्हेंबरपर्यंत हयात प्रमाणपत्र सादर करा

मुंबई : अखिल भारतीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी ३० नोव्हेंबर, २०१९ पर्यंत हयातीचे दाखले सादर करावेत, असे आवाहन मुंबईच्या अधिदान व लेखा अधिकाऱ्यांनी केले आहे.
निवृत्तीवेतनधारकांची आद्याक्षरनिहाय यादी संबंधित बँक शाखांकडे पाठविली आहे. निवृत्ती व कुटुंब निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेत असतील, त्या बँकेत प्रत्यक्ष हजर राहून १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर, २०१९ या काळात यादीतील नावापुढील स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थाकासमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवावा. पॅन क्रमांक नमूद करणेही आवश्यक आहे. पुनर्विवाह वा पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती नोंदवावी, असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या संकेतस्थळावरून जीवन प्रमाण दाखला (डिजिटल लाइफ सर्टिफिकेट) सादर करता येईल. जीवनप्रमाण पोर्टलवर नोंदणी करताना निवृत्तीवेतनधारकांनी संबंधित कोषागाराची निवड करावी. संपूर्ण नाव, मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्रमांक (पीपीओ नंबर) अचूक नोंदविणे आवश्यक आहे. खातेधारकांना ही प्रक्रिया दरवर्षीच पूर्ण करावी लागत असते.
>अन्यथा निवृत्तीवेतन स्थगित
आधार केंद्रावर वा खासगी संगणकीकृत जीवनप्रमाण सुविधा केंद्राद्वारे हयातीचे दाखले सादर करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा पीपीओ नंबर अचूक असल्याची खात्री करावी. ज्यांनी यादीतील नावापुढे स्वाक्षरी वा अंगठ्याचा ठसा किंवा संगणकीकृत जीवनप्रमाण दाखल सादर केला नसेल, तर त्यांचे निवृत्तीवेतन डिसेंबर, २०१९ पासून स्थगित करण्यात येईल, असा इशारा लेखा कार्यालयाने दिला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title:  Submit a Survival Certificate by November 7th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.