Vodafone Idea Stock Price: टेलीकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये बुधवारी, ३१ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात २ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळ आज 'ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू' (AGR) प्रकरणावर विचार करू शकते, अशा मीडिया रिपोर्ट्समुळे ही वाढ झाली आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, कंपनीसमोरील आर्थिक आव्हानं कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ आजच्या बैठकीत व्होडाफोन आयडियाच्या 'बेलआउट' प्लॅनवर चर्चा करू शकते.
बाजारातील स्पर्धा टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न
यापूर्वी मंगळवारी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पीटीआयला (PTI) सांगितलं होतं की, दूरसंचार बाजार केवळ दोन कंपन्यांच्या हातात मर्यादित राहू नये आणि ग्राहकांचं हित जपण्यासाठी बाजारात स्पर्धा कायम राहावी, या उद्देशानं सरकार व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएलला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे. कॅबिनेट कडून मिळणारा कोणताही दिलासा व्होडाफोन आयडियासाठी संजीवनी ठरू शकतो, कारण कंपनीवर सरकारचं सुमारे २ लाख कोटी रुपयांचं देणं आहे.
कधी काळी १२० रुपयांच्या आसपास होता शेअर
एप्रिल २०१५ मध्ये आयडियाचे शेअर्स १२० रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर होते. मात्र, त्यानंतर कंपनीची आर्थिक स्थिती खालावत गेली आणि आता हा शेअर १२ रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. या वर्षात या शेअरने ६.१२ रुपयांचा नीचांक आणि १२.३२ रुपयांचा उच्चांक पाहिला आहे.
सहा महिन्यांत ६४ टक्क्यांहून अधिक उसळी
व्होडाफोन आयडियाच्या शेअर्सनी गेल्या ५ वर्षांत सुमारे ९ टक्के परतावा दिला आहे, तर गेल्या एका वर्षात ५३ टक्के इतका बंपर परतावा दिला आहे. केवळ या वर्षाचा विचार केला तर हा परतावा ५२ टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या सहा महिन्यांत या स्टॉकनं ६४ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे, तर गेल्या एका महिन्यात त्यात २३ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
