देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आपल्या भागधारकांना मोठा लाभांश देणार आहे. टाटा समूहाच्या या कंपनीने शेअर बाजार एक्सचेंजला दिलेल्या माहितीत सांगितलं की, संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी तिसऱ्या अंतरिम लाभांशाची घोषणा केली आहे. टीसीएसनं एक्सचेंज फायलिंगमध्ये नमूद केलंय की, १ रुपया फेस व्हॅल्यू असलेल्या प्रत्येक शेअरवर एकूण ५७ रुपये लाभांश दिला जाईल. कंपनीनं स्पष्ट केलं की, या ५७ रुपयांच्या लाभांशामध्ये ११ रुपये अंतरिम लाभांश आणि ४६ रुपये विशेष लाभांश यांचा समावेश आहे. अशा प्रकारे टीसीएसच्या भागधारकांना प्रति शेअर एकूण ५७ रुपये लाभांश मिळेल.
बीसीसीएल आयपीओ अलॉटमेंट आज, तुम्हाला मिळालाय का शेअर; GMP किती? जाणून घ्या
३ फेब्रुवारीला खात्यात जमा होणार रक्कम
टीसीएसनं सोमवारी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीने लाभांशाबाबतची स्वतंत्र माहिती शेअर केली. टीसीएसने एक्सचेंज फायलिंगमध्ये सांगितलं की, ५७ रुपयांच्या या लाभांशासाठी शनिवार, १७ जानेवारी ही 'रेकॉर्ड डेट' निश्चित करण्यात आली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराला या लाभांशाचा लाभ घ्यायचा असेल, तर त्याला रेकॉर्ड डेटच्या एक दिवस आधी शेअर्स खरेदी करावे लागतील. टीसीएसच्या बाबतीत, शुक्रवार १६ जानेवारीपर्यंत खरेदी केलेल्या शेअर्सवरच लाभांशाचा लाभ मिळेल. रेकॉर्ड डेटच्या दिवशी ज्या भागधारकांची नावे रेकॉर्डमध्ये असतील, त्यांच्या बँक खात्यात ३ फेब्रुवारी रोजी लाभांशाचे पैसे जमा केले जातील.
निव्वळ नफ्यात १३.९१ टक्क्यांची घट
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) सोमवारी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल सादर करताना सांगितलं की, या काळात त्यांचा निव्वळ नफा १३.९१ टक्क्यांनी घटून १०,६५७ कोटी रुपये झालाय. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीनं १२,३८० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता, तर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १२,०७५ कोटी रुपये होता. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल ४.८६ टक्क्यांनी वाढून ६७,०८७ कोटी रुपये झालाय, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीत ६३,९७३ कोटी रुपये होता.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
