प्रसाद गो. जोशी
जीएसटीमधील आगामी बदलांमुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून त्याने बाजाराला फायदा होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठवड्यात याच जोरावर मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले आहेत. आगामी आठवड्यात बाजार येणाऱ्या आकडेवारीकडे लक्ष ठेवत सावध पावले टाकण्याची शक्यता आहे.
आगामी सप्ताहात भारतातील चलनवाढीची आकडेवारी महत्त्वाची आहे. याशिवाय जागतिक पातळीवर ज्यामुळे परिणाम होईल अशी, अमेरिकेची चलनवाढ, अमेरिकेतील बेरोजगारीही आकडेवारी तसेच जपान मधील दुसऱ्या तिमाहीच्या जीडीपीचे आकडे जाहीर होणार आहेत. युरोपियन बँकेचे व्याजदरही या सप्ताहात जाहीर होतील. या आकडेवारीकडे बाजार लक्ष ठेवून असून त्याचा परिणाम वाढ वा घट या स्वरूपात दिसून येणार आहे.
गुंतवणूकदारांचे अमेरिकेकडे लक्ष
ट्रम्प यांचे विधान केवळ भारताने करार करावा यासाठी होते की खरंच टॅरिफ कमी होते हे बघणे महत्त्वाचे आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्वची बैठक पुढील आठवड्यात होत आहे .त्यासाठी या आठवड्यात जाहीर होणारी आकडेवारी महत्त्वाची आहे. म्हणूनच गुंतवणूकदार त्याकडे लक्ष ठेवून आहेत.
शेअर बाजारात गेल्या आठवड्यात वाढ झाल्यामुळे एकूण बाजार भांडवल मूल्यातही चांगली वाढ झाली आहे. या आठवड्यात गुंतवणूकदार सुमारे आठ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत झाले आहेत. मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचे एकत्रित भांडवल मूल्यही वाढले आहे.