Rupee At All Time Low : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत सत्तेच्या सारीपाटावर आल्यापासून जगभरात अनेक समिकरणे बदलली आहेत. खासकरुन याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. डॉलर मजबूत झाल्याने रुपयाची नीचांकी पातळीवर घसरण सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय चलन रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ४४ पैशांनी घसरला. या घसरणीनंतर रुपयाने नीचांकी पातळीवर पोहोचण्याचा नकोसा विक्रम केला आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय चलनाचे मूल्य ८७.९४ पर्यंत घसरले. रुपयाच्या घसरणीची अनेक कारणे आहेत. पण, भारतीय चलनाचे व्यवस्थापन करण्यासाठी तातडीने पावले उचलली नाहीत, तर ते मोठ्या संकटाचे कारण बनू शकते. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे.
रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर
गेल्या दोनतीन महिन्यापासून रुपयाच्या घसरणीचा ट्रेंड सुरू आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ३ फेब्रुवारीला रुपयाने पहिल्यांदा ८७ चा आकडा पार केला. पण, यानंतरही रुपया थांबायचं नाव घेताना दिसत नाही. सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात, तो प्रति डॉलर ८७.९४ पर्यंत घसरला, जो रुपयाची सर्वकालीन नीचांकी पातळी आहे. रुपयाची घसरण अशीच सुरू राहिली तर तो लवकर शंभरी पार करू शकतो, अशी भिती अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
भारतीय चलन रुपया सातत्याने का घसरतोय?
भारतीय रुपया घसरण्यामागे अनेक कारणे आहेत. याचं मुख्य कारण डोनाल्ड ट्रम्प यांचे आयात शुल्क लादण्याचा निर्णय आहे. वास्तविक, सुरुवातीला ही आयात शुल्क फक्त चीन, कॅनडा आणि मेक्सिको या देशांवर लादण्यात येईल, असं वाटत होतं. मात्र, गेल्या आठवड्याच्या शेवटी त्यांनी शुल्काशी संबंधित आणखी एक मोठी घोषणा केली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यूएसमध्ये आयात होणाऱ्या सर्व स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवर २५% शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. या आठवड्याच्या शेवटी हे नवीन टॅरिफ धोरण येऊ शकते. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. टॅरिफ वॉरमध्ये वाढ झाल्यामुळे जागतिक चलन बाजारात अस्थिरता वाढताना दिसत असून त्याचा परिणाम आणि दबाव भारतीय रुपयावरही दिसून आला आहे.
मेटल शेअर्स घसरले
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन आयात शुल्क धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात आज मेटल शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एनटीपीसी आणि एचडीएफसीमध्ये मोठी घसरण आहे. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३० पैकी २५ शेअर्स लाल रंगात व्यवहार करत आहेत. धातूचे शेअर्स मोठ्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. मेटलनंतर फार्मा समभागातही घसरण होत आहे.