PSU Bank Stocks: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर सोमवारी कामकाजादरम्यान ४% पर्यंत वाढले. सरकारकडून काही सरकारीबँकांचं विलीनीकरण आणि छोट्या बँकांचं खासगीकरण करण्याच्या नव्या योजनेच्या बातम्यांनंतर ही वाढ दिसून आली.
या बातमीनंतर, बँक ऑफ बडोदामध्ये ४.२६% ची वाढ झाली. इंडियन बँकेत २.७३%, कॅनरा बँकेत २.१८%, यूको बँकेत १.६३% ची वाढ दिसली. बँक ऑफ इंडियामध्ये १.४२%, पंजाब अँड सिंध बँकेत १.३८%, स्टेट बँकेत १.०६% आणि सेंट्रल बँकेत १.०१% ची वाढ नोंदवली गेली. याव्यतिरिक्त, आयओबी (IOB), युनियन बँक ऑफ इंडिया, पीएनबी (PNB) आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.
मुंबईतील दोन मोठ्या बँकांच्या विलीनीकरणाची तयारी
'मिंट'च्या एका रिपोर्टनुसार, भारत सरकार युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यांच्या विलीनीकरणाची योजना आखत आहे. या दोन्ही बँकांचे मुख्यालय मुंबईत आहे. हे विलीनीकरण झाल्यास, ही बँक देशातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नंतरची दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक बनेल.
चेन्नईतील बँकांचाही समावेश होऊ शकतो
या अहवालात असंही नमूद केलंय की, अर्थ मंत्रालय चेन्नई येथील इंडियन ओव्हरसीज बँक आणि इंडियन बँक यांच्या विलीनीकरणाची शक्यता देखील तपासत आहे.
छोट्या बँका खासगीकरणाच्या कक्षेत
सरकारचं हे पाऊल आगामी वर्षांमध्ये बँकिंग प्रणालीला बळकट करण्याच्या आणि त्यांच्या कामकाजातील ड्युप्लिकेशन कमी करण्याच्या उद्दिष्टाचा भाग आहे. याच क्रमात, अहवालानुसार, पंजाब अँड सिंध बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांसारख्या छोट्या बँकांना भविष्यात खासगी हातात विकण्याचा विचार केला जात आहे, कारण त्यांची मालमत्ता इतर मोठ्या सार्वजनिक बँकांच्या तुलनेत कमी आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
