प्रसाद गो. जोशी: सेन्सेक्स आणि निफ्टीची सलग चार आठवड्यांची वाढ थांबली असली तरी, मिडकॅप आणि स्मॉल कॅप या दोन्ही निर्देशांकांनी चांगली वाढ कायम ठेवली आहे. त्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदारांनी या निर्देशांकांतील समभागांकडे अधिक लक्ष द्यायला हवे. त्यामुळे चांगला लाभही होऊ शकतो. या आठवड्यात कंपन्यांचे निकाल, भारत-अमेरिका व्यापार करारावरील चर्चेकडे बाजाराचे लक्ष राहील. गत आठवड्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कपात जाहीर केली. त्यामुळे तेथील गुंतवणूक कमी होण्याची शक्यता आहे.
निर्देशांक घटले तरी गुंतवणूकदार श्रीमंत
गतसप्ताहात सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांमध्ये घट झाली असली तरी, गुंतवणूकदारांची मालमत्ता वाढल्याचे दिसून येत आहे. गतसप्ताहात गुंतवणूकदारांची मालमत्ता १ लाख ३३ हजार ५६४.५२ कोटी रुपयांनी वाढली आहे.
अमेरिकन कंपन्यांचा भारताकडे ओढा वाढला, बाजार वाढणार?
गतसप्ताहात परकीय वित्तसंस्थांनी नफा कमवण्यासाठी भारतीय बाजारात २१०२ कोटी रुपयांची विक्री केली. मागील काही महिन्यातल्या तुलनेत परकीय वित्तसंस्थांची विक्री ऑक्टोबर महिन्यात कमी (२३४६ कोटी रुपये) झाली आहे. अमेरिकेतील व्याजदर कमी झाल्याने या संस्था भारतात गुंतवणूक करण्याची शक्यता वाढली आहे.
देशांतर्गत वित्तसंस्थांकडून बाजारातील गुंतवणूक चालूच आहे. गतसप्ताहात या संस्थांनी १८८०४.२६ कोटी रुपयांची गुंतवणूक भारतीय बाजारात केली. ऑक्टोबर महिन्यात या संस्थांनी ५२७९४.०२ कोटी रुपये बाजारात गुंतवले आहेत. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात व्यवहार होत आहेत.
