देशातील सर्वात आलिशान हॉटेल ब्रँडपैकी एक असलेल्या लीला पॅलेस एड रिसॉर्टनं स्थापनेच्या सुमारे ४० वर्षांनंतर सोमवारी, २६ मे रोजी शेअर बाजारात एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला. लीला हॉटेलची मालकी असलेल्या ब्रुकफिल्ड श्लॉस बेंगळुरूनं आपला आयपीओ बाजारात आणला आहे, जो २८ मेपर्यंत सब्सक्रिप्शनसाठी खुला असेल. हॉटेलची चेन एका निवृत्त सैनिकानं सुरू केली होती, पण त्यांनी आपल्या मुलांच्या हातात कमान सोपवताच कंपनीच्या ब्रँड नेमसह सर्व मालमत्ता विकण्यात आल्या.
बाजारातून ३,५०० कोटी रुपये उभे करण्यासाठी कंपनीने हा आयपीओ लाँच केला आहे. या आयपीओमध्ये शेअर्सची किंमत ४१३ ते ४३५ रुपये प्रति युनिट आहे. यात गुंतवणूक करणाऱ्यांना किमान ३४ शेअर्स खरेदी करावे लागतील. म्हणजेच गुंतवणूकदारांना किमान १४,७९० रुपये गुंतवावे लागतील. गुंतवणूकदार जास्तीत जास्त ४४२ शेअर्सचे १३ लॉट खरेदी करू शकतो, ज्याचं एकूण मूल्य १,९२,२७० रुपये आहे.
'या' IPO चं धमाकेदार लिस्टिंग; १८ टक्क्यांनी वधारला शेअर, गुंतवणूकदार मालामाल
कोणी सुरू केलेली कंपनी?
लीला पॅलेस, हॉटेल अँड रिसॉर्टची सुरुवात १९८६ साली निवृत्त कॅप्टन सीपी कृष्णन नायर यांनी केली होती. त्यांनी आपली पत्नी लीला यांच्या नावावरून हे नाव ठेवलं. या हॉटेल चेनची पहिली प्रॉपर्टी लीला मुंबई या नावानं मुंबईत उघडण्यात आली होती. ते एक यशस्वी उद्योजक होते आणि त्यांनी आपल्या अनुभवांसह लक्झरी भारतीय हॉस्पिटॅलिटी चेन सुरू केली. लीला ब्रँड केवळ भारतातच नाही तर जगभरात आपल्या लक्झरी सुविधा आणि खास लोकेशनसाठी ओळखला जातो.
किती आहेत हॉटेल्स?
देशभरात लीला ब्रँडची सुमारे २० हॉटेल्स आणि मालमत्ता असून, त्यापैकी १२ सुरू आहेत. बंगळुरु, चेन्नई, उदयपूर, जयपूर, गुरुग्राम, मुंबई, केरळ आणि हैदराबाद येथे या मालमत्ता आहेत. हॉटेलचे सध्याचे मालक ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट आता त्याचा परदेशात विस्तार करण्याची योजना आखत आहेत. सध्या फक्त मुंबईतील लीला हॉटेल अँड पॅलेस त्याच्या जुन्या मालकांकडे आहे, उर्वरित सर्व मालमत्ता आतापर्यंत विकल्या गेल्यात.
कंपनी तोट्यात
२०१४ मध्ये कॅप्टन नायर यांच्या निधनानंतर कंपनी तोट्यात जाऊ लागली आणि कंपनीवर ५,००० कोटी रुपयांचं कर्ज होते. मृत्यूपूर्वी नायर यांनी कंपनीची मालकी विवेक आणि दिनेश नायर या दोन मुलांकडे सोपवली होती. दोघांनाही कंपनी वाचवण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि २ वर्षे पगारही घेतला नाही. वारंवार डिफॉल्ट होत असल्यानं अखेर २०१८ मध्ये कंपनीची विक्री करावी लागली.
ब्रँडसह प्रॉपर्टीचीही विक्री
कॅप्टन नायर यांच्यानंतर ही मालमत्ता मुलांच्या हातात आल्यानंतर अवघ्या ५ वर्षांतच या लक्झरी हॉटेलचं नाव आणि ब्रँडसह बहुतांश मालमत्ताही विकल्या गेल्या. कॅनडाचा रिअल इस्टेट फंड ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंटनं दिल्ली, उदयपूर, चेन्नई आणि बंगळुरू येथील मालमत्तांसह आग्रा येथील ताजमहालजवळ जमीनही खरेदी केली आहे. याशिवाय बंगळुरू येथील जमिनीचा परवाना करार आणि मुंबईतील मालमत्तेचा परवानाही कॅनेडियन कंपनीनं मिळवला होता. हा व्यवहार ३,९५० कोटी रुपयांचा होता, ज्यात गोव्यातील २०६ खोल्यांच्या मालमत्तेचा समावेश होता. एकट्या या मालमत्तेची किंमत ७२१ कोटी रुपये होती, तर एका खोलीची किंमत साडेतीन कोटी रुपये होती.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)