ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसी (ICICI Prudential AMC) च्या IPO मध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या दिवशीच चांगला फायदा झाला. १ रुपया फेस व्हॅल्यू असलेला या कंपनीचा शेअर आज बीएसईवर २,६०६.२० रुपयांवर लिस्ट झाला. आयपीओद्वारे हा शेअर २,१६५ रुपयांना मिळाला होता. याचा अर्थ गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी २०.३८ टक्के किंवा ४४१.२० रुपयांचा फायदा झाला आहे. १०,६०२ कोटी रुपयांचा हा IPO २०२५ मधील सर्वात मोठ्या IPO पैकी एक आहे. हा आयपीओ ३९.१७ पट ओव्हर सबस्क्राइब झाला होता.
जीएमपी (GMP) काय होता?
IPO लिस्टिंगपूर्वी, याचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) सुमारे २४.६२% किंवा ५३३ रुपयांवर पोहोचला होता. यामध्ये सातत्यानं वाढ होत होती. गुंतवणूकदारांना हा एक शेअर २,१६५ रुपयांना मिळाला आहे.
केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
३९ पट ओव्हरसबस्क्राइब
या IPO ला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ICICI Prudential AMC ला संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून खूप चांगलं सबस्क्रिप्शन मिळालं, जे भारतातील सर्वात मोठ्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीवरील विश्वास दर्शवते. हा IPO एकूण ३९.१७ पट सबस्क्राइब झाला. यामध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचं (QIBs) मोठे योगदान राहिले, ज्यांनी आपला हिस्सा सुमारे १२४ पट सबस्क्राइब केला. नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा (NIIs) हिस्सा २२ पट सबस्क्राइब झाला, तर रिटेल गुंतवणूकदारांनी त्यांच्या कोट्यात २.५३ पट सबस्क्रिप्शन केलं. ICICI Bank च्या भागधारकांसाठी राखीव असलेली कॅटेगरी सुमारे १० पट सबस्क्राइब झाली.
पूर्णपणे 'ऑफर फॉर सेल'
हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) होता, ज्यामध्ये ४.९० कोटी शेअर्सची विक्री करण्यात आली. याचा अर्थ असा की, कंपनीला या IPO मधून कोणताही पैसा मिळणार नाही. लिस्टिंगनंतरही, ICICI Bank आणि Prudential Corp कडे या एसेट मॅनेजर कंपनीतील ९०% पेक्षा जास्त हिस्सा राहील. या IPO द्वारे कंपनीचं प्री-IPO मार्केट कॅप सुमारे १.०७ लाख कोटी रुपये अंदाजित करण्यात आले होते.
कंपनी काय करते?
ICICI Prudential AMC ही भारतातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे, जी ॲक्टिव्ह म्युच्युअल फंड एसेट्सच्या बाबतीत आघाडीवर आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत, कंपनीने १०.१ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त तिमाही सरासरी मालमत्तेचं (AUM) व्यवस्थापन केलं. ही कंपनी म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स आणि ॲडव्हायझरी सर्व्हिसेस यांसारख्या क्षेत्रांत काम करते. देशभरात या कंपनीची २७२ कार्यालयं आहेत, ज्यामुळे एक मोठं डिस्ट्रिब्युशन नेटवर्क तयार झालं आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
