Stock Market Down: भारतीय शेअर बाजारात गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या घसरणीमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे खिसे तर रिकामे होतच आहेत, शिवाय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांनाही मोठा झटका बसला आहे. रेखा झुनझुनवाला, विजय केडिया आणि आशिष कचोलिया या तीन दिग्गजांना या घसरणीमुळे २८,०५५ कोटी रुपयांचं नुकसान झालंय. सप्टेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात घसरण सुरू झाली.
त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी तब्बल १४ टक्क्यांनी घसरले आहेत. त्याचबरोबर मार्केट लीडर्सचा पोर्टफोलिओ २० टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत घसरला आहे. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओत सर्वाधिक घसरण झाली आहे. त्यांचा पोर्टफोलिओ ६१ टक्क्यांनी घसरला असून तो १७ हजार कोटी रुपयांच्या खाली आलाय. २४ ऑक्टोबरपासून रेखा झुनझुनवाला यांच्या शेअर्समधील एकूण गुंतवणुकीचं मूल्य २६,८६६ कोटी रुपयांनी घटले आहे. कॉर्पोरेट शेअरहोल्डिंगच्या २४ डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, त्यांच्याकडे २५ कंपन्यांचे शेअर्स आहेत. त्यांचं मूल्य घटून १६,८९६ कोटी रुपये झाले आहे, जे २४ सप्टेंबर रोजी ४३,७६२ कोटी रुपये होतं.
बिग व्हेलनाही मोठं नुकसान
शेअर बाजारात बिग व्हेल म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांचंही मोठं नुकसान झालंय. सप्टेंबर २०२४ पासून त्यांच्या पोर्टफोलिओचं मूल्य १९ टक्क्यांनी म्हणजेच ५५७ कोटी रुपयांनी कमी झालंय. सप्टेंबरपूर्वी त्यांच्या पोर्टफोलिओचं मूल्य २,९२८ कोटी रुपयांवरून २,३७१ कोटी रुपयांवर आलं. कचोलिया यांनी हॉस्पिटॅलिटी, एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात अधिक पैसा गुंतवला आहे.
विजय केडियांनाही मोठं नुकसान
स्मॉल आणि मिडकॅप मल्टिबॅगर्स ओळखण्यात माहिर असलेल्या विजय केडिया यांनाही बाजारातील घसरणीचा फटका बसलाय. १ ऑक्टोबर २०२४ पासून त्यांच्या गुंतवणुकीच्या संपत्तीत ६३२ कोटी रुपयांची घट झाली आहे. केडिया यांच्याकडे एकूण १५ कंपन्यांचे शेअर्स आहेत. हे असे शेअर्स आहेत ज्यात त्यांचा हिस्सा एक टक्का किंवा त्यापेक्षा जास्त आहे. यातील अनेक खरेदी त्यांच्याच कंपनी केडिया सिक्युरिटीजच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. अतुल ऑटो आणि तेजस नेटवर्क्स सारख्या शेअर्समध्ये त्यांची मोठी गुंतवणूक आहे.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)