भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने गतसप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये बाजारावर विक्रीचे दडपण येऊनही बाजाराने वाढ दाखविली. आगामी काळामध्ये या तणावात काही बदल झाल्यास त्यावर बाजाराची नजर आहे. या तणावामुळे बाजारातील तेजीला ब्रेक लागणार का? अशी भीती गुंतवणूकदारांच्या मनात आहे. याशिवाय या सप्ताहामध्ये जाहीर होणारी विविध आकडेवारी ही काहीशी चांगली आल्यास बाजारामधील घसरणीची भीती कमी होणार आहे.
परकीय वित्तसंस्थांची गुंतवणूक कायम
जगभरातील अनुकूल संकेत आणि देशांतर्गत चांगले वातावरण यामुळे परकीय वित्तसंस्थांनी भारतामध्ये गुंतवणूक कायम ठेवली आहे. गतसप्ताहात संस्थांनी १७, ४२५ कोटीं गुंतवणूक भारतीय शेअर बाजारात केली. १८ एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये या संस्थांनी ८५०० कोटींची गुंतवणूक केली.
व्याजदरांचाही परिणाम
या सप्ताहामध्ये पीएमआय, वाहन खरेदीची आकडेवारी त्याचबरोबर अमेरिकेच्या जीडीपीची आकडेवारी, बँक ऑफ जपानचे व्याजदर आणि विविध कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. या सप्ताहामध्ये सुमारे १९० कंपन्यांच्या तिमाही निकालांची घोषणा होणार आहे.
भारत पाकिस्तान दरम्यानचा तणाव निवळल्यास स्थितीत सकारात्मक बदल होऊन बाजारावरही चांगला परिणाम होऊ शकतो. ही स्थिती लवकर सुधारावी, अशीच गुंतवणूकदारांची भावना आहे. याशिवाय अमेरिकेतील बेरोजगारीचा अहवालही येणार आहे. टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी बाजारासाठी महत्वाची आहे.