ICICI Prudential IPO: या वर्षातील आणखी एक बहुचर्चित आयपीओ, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल (ICICI Prudential), उद्या शुक्रवारपासून (१२ डिसेंबर) खुला होत आहे. आयपीओ बाजारात येण्यापूर्वीच, झुनझुनवाला कुटुंबानं या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. इकोनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, झुनझुनवाला कुटुंबासह मधुसूदन केला, मनीष चौखनी, आणि प्रशांत जैन यांसारख्या २६ दिग्गज गुंतवणूकदारांनी कंपनीत गुंतवणूक केली आहे.
४९०० कोटी रुपयांची विक्री
यूके-स्थित प्रुडेन्शियल कॉर्पोरेशननं कंपनीतील आपला ४.५ टक्के हिस्सा सुमारे ४९०० कोटी रुपयांना विकला आहे. यापैकी अनेक स्वदेशी आणि विदेशी गुंतवणूकदारांनी एकूण २६७५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अबुधाबीच्या लूनाट, एसबीआय लाईफ, एचडीएफसी लाईफ, कोटक लाईफ आणि इतर गुंतवणूकदारांनी कंपनीत पैसा लावला आहे.
कोणाची किती गुंतवणूक?
एफआयआय (FII) व्हाइटओक, कॅपिटल मालाबार आणि थिंक इन्व्हेस्टमेंट यांनीही कंपनीत गुंतवणूक केली आहे. झुनझुनवाला कुटुंबानं आयसीआयसीआय प्रुडेन्शियलमध्ये १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. याशिवाय प्रशांत जैन यांच्या फंडातर्फे आणि केला कुटुंबाकडून प्रत्येकी ४५-४५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलीये.
आयसीआयसीआय बँकेने अतिरिक्त २ टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी २१४० कोटी रुपये दिले आहेत. हा आयपीओ १२ ते १६ डिसेंबर पर्यंत खुला राहणार असून, तो पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर (OFS) आधारित आहे. प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन या आयपीओद्वारे त्यांचा १० टक्के हिस्सा विकत आहे.
वर्तमान भागभांडवल गेल्या महिन्यापर्यंत, आयसीआयसीआय बँकेकडे कंपनीचा ५१ टक्के हिस्सा होता, तर प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंग्सकडे ४९ टक्के हिस्सा होता. आयसीआयसीआय बँकेने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीमधील अतिरिक्त २ टक्के हिस्सा खरेदी केला आहे.
कंपनीची स्थिती आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी ही देशातील सर्वात मोठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. मार्च २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, सक्रिय म्युच्युअल फंड मार्केटमध्ये कंपनीची १३.३० टक्के भागीदारी आहे. ही देशातील सर्वाधिक नफा कमावणारी एएमसी आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
