Silver prices rise, prices cross 3 thousand | चांदीच्या दरामध्ये तेजी, भाव ५० हजारांच्या पार
चांदीच्या दरामध्ये तेजी, भाव ५० हजारांच्या पार

नवी दिल्ली : कमोडिटी मार्केटमध्ये बुधवारी सोन्याच्या भावाने नवीन उच्चांक गाठल्यानंतर त्यामध्ये काहीशी घसरण झाली. मात्र, चांदीच्या दरामध्ये चांगलीच तेजी आली असून, दर ५० हजारांच्या पार गेले आहेत. एमसीएक्सवर बुधवारी सोन्याच्या दराने ३९,७७७ रुपये असा उच्चांक केला. त्यानंतर विक्रीचा दबाव वाढल्याने आॅक्टोबरच्या वायदा व्यवहारांमध्ये भाव १९७ रुपये कमी होऊन ३९,४३८ रुपयांवर बंद झाले.

चांदीमध्ये बुधवारी मोठी तेजी बघावयास मिळाली. डिसेंबर महिन्याच्या वायदा व्यवहारांमध्ये चांदीच्या दरात ४१४ रुपयांची तेजी बघावयास मिळाली. त्यामुळे चांदीचा भाव ५०,९८५ रुपयांवर पोहोचला आहे. आॅक्टोबर महिन्यापर्यंत सोने ४० हजारांची, तर चांदी ५२ हजारांची भावपातळी ओलांडेल, असा होरा बाजारात व्यक्त केला जात आहे. अमेरिकेमध्ये उत्पादन कंपन्यांची कामगिरी ही गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे.

सोन्याच्या व्यवहारामध्ये नफा कमविण्याचा प्रकार दिसून येत असल्याने दर खाली आले आहेत. मात्र, अद्यापही या बाजारात तेजीचे संकेत आहेत. अमेरिकेतील कंपन्यांची उत्पादनक्षमता कमी झाली असल्याने डॉलरचे मूल्य कमी होत आहे. डॉलरचे मूल्य कमी झाले की, सोन्याची मागणी वाढते, हा नेहमीचा अनुभव असल्याने आगामी काळात सोने आणखी उच्चांक करू शकते.
- अमित सजेजा, सहायक उपाध्यक्ष, मोतीलाल ओस्तवाल,
कमोडिटी व करन्सी विभाग
 

Web Title: Silver prices rise, prices cross 3 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.