EPF vs GPF : तुम्ही देखील खाजगी क्षेत्रात काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकार खाजगी क्षेत्रातील लोकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी अनेक योजना चालवत आहे. यामध्ये भविष्य निर्वाह निधी (पीएफ) सर्वात महत्त्वाची योजना आहे. मात्र, यात आणखी ३ श्रेणी आहेत, हे अनेकांना माहिती नाही. किंवा या योजना एकच आहेत, असाही अनेकांचा गैरसमज आहे. आज तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील. भविष्य निर्वाह निधीमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF), आणि सामान्य भविष्य निर्वाह निधी (GPF) असे ३ प्रकार आहेत. मध्य प्रदेशातील सतना शहरातील महानगरपालिकेत जीपीएफ घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता जीपीएफची जोरदार चर्चा होत आहे.
जीपीएफ आणि ईपीएफमधील मुख्य फरक म्हणझे जीपीएफमध्ये केवळ सरकारी कर्मचारीच योगदान देऊ शकतात. तर खाजगी क्षेत्रातील कर्मचारी देखील EPF मध्ये योगदान देऊ शकतात. GPF याजनेतून सेवानिवृत्तीच्या वेळी एकरकमी रक्कम मिळते. तर, कर्मचारी ५८ वर्षांचा झाल्यावर EPF योजनेतील गुंतवणूक परिपक्व होते. प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या कलम ८०C अंतर्गत GPF मधील योगदान, मिळालेले व्याज आणि परतावा याला करातून सूट आहे. याउलट EPF खात्यात १.५ लाख रुपयांपर्यंतचे योगदानलाच आयकरातून सूट मिळते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)
कोणत्याही कंपनीमध्ये २० किंवा त्याहून जास्त कर्मचारी असतील तर अशा ठिकाणी काम करणारे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेत येतात. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही योजना सरकारने सुरू केली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराचा काही भाग ईपीएफमध्ये जमा केला जातो. त्याचवेळी कंपनीकडूनही तेवढेच योगदान यात केलं जातं. वास्तविक, कंपनीने केलेल्या एकूण योगदानापैकी केवळ ३.६७% EPF मध्ये जाते, तर उर्वरित ८.३३% कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मध्ये जमा केले जाते. निवृत्तीनंतर ईपीएफमध्ये जमा केलेली रक्कम कर्मचाऱ्यांना एकरकमी दिली जाते. तर पेन्शन योजनेंतर्गत जमा केलेली रक्कम निवृत्तीनंतर मासिक पेन्शन म्हणून वापरली जाते.
या योजनेसाठी दरवर्षी व्याजदर निश्चित केला जातो. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ईपीएफसाठी ८.२५ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. ही योजना केवळ आर्थिक सुरक्षा देत नाही तर निवृत्तीसाठी पेन्शनची गरज भागवते. ही सरकारी योजना असल्याने यातील गुंतवणूक सुरक्षित समजली जाते.
सामान्य भविष्य निर्वाह निधी (GPF)
जीपीएफ (जनरल प्रॉव्हिडंट फंड) ही बचत योजना केवळ सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. ईपीएफप्रमाणेच हा एक सुरक्षित बचतीचा पर्याय तर असून निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्यही देतो. ही केवळ बचत किंवा निवृत्ती योजना नाही. तर मुलांचे शिक्षण, वैद्यकीय आणीबाणी किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला यातून पैसे काढता येतात. यामध्ये, कर्मचारी त्यांच्या पगाराच्या किमान ६% योगदान देतात. सेवानिवृत्तीच्या वेळी जमा झालेली रक्कम करमुक्त असते. सध्या GPF वर ७.१% व्याज दर लागू आहे. एक वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर सर्व तात्पुरते आणि कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी या योजनेत सहभागी होऊ शकतात.