UCO Bank Savings Scheme : भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२५ या वर्षात रेपो रेटमध्ये एकूण १.२५ टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त झाले असले, तरी मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजात घट झाल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये काहीशी नाराजी होती. मात्र, या परिस्थितीतही सार्वजनिक क्षेत्रातील 'यूको बँक' आपल्या ग्राहकांना मुदत ठेवींवर आकर्षक परतावा देत आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजाची मेजवानी
- यूको बँकेने आपल्या विविध कालावधीच्या एफडीवर २.९० टक्क्यांपासून ७.९५ टक्क्यांपर्यंत व्याजदर निश्चित केले आहेत. विशेष म्हणजे, बँक आपल्या निवृत्त ज्येष्ठ नागरिक कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फायदा देत आहे.
- ४४४ दिवसांची विशेष योजना : या विशेष मुदत ठेव योजनेवर बँक सर्वाधिक व्याज देत आहे.
- सामान्य नागरिक : ६.४५% व्याज.
- ज्येष्ठ नागरिक : ६.९५% व्याज.
- बँकेचे कर्मचारी : ७.४५% व्याज.
- निवृत्त ज्येष्ठ नागरिक कर्मचारी : ७.९५% व्याज (१.५०% अतिरिक्त व्याज).
३ वर्षांच्या एफडीवर किती मिळेल परतावा?
- जर तुम्ही ३ वर्षांच्या कालावधीसाठी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर तुम्हाला मिळणारा परतावा खालीलप्रमाणे असेल.
- सामान्य नागरिक : १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ३ वर्षांनंतर तुम्हाला एकूण १,१९,५६२ रुपये मिळतील. यामध्ये १९,५६२ रुपये हे निश्चित व्याजाचे असतील. या योजनेत ६.००% दराने व्याज मिळते.
- ज्येष्ठ नागरिक : ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजाचा दर ६.५०% असून, १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मॅच्युरिटीनंतर १,२१,३४१ रुपये मिळतील. यात २१,३४१ रुपये हे निव्वळ व्याजाचे उत्पन्न असेल.
वाचा - विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
सुरक्षित गुंतवणुकीचा खात्रीशीर पर्याय
शेअर बाजारातील चढ-उतारांच्या काळात मुदत ठेव हा आजही सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. मुदत ठेवींमध्ये एक ठराविक काळ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मूळ रकमेसह व्याजाचे पैसे हमखास मिळतात. यूको बँकेच्या या योजनांमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या बचतीवर चांगला परतावा मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे.
