Government Schemes: आयुष्यात अचानक येणारी परिस्थिती टाळण्यासाठी प्रत्येकानं सदैव तयार राहिलं पाहिजे. यासाठी विमा असणं अत्यंत गरजेचं आहे. साधारणपणे विम्याचा हप्ता इतका महाग असतो की गरीब आणि गरजूंना तो विकत घेता येत नाही. अशा लोकांच्या मदतीसाठी सरकारकडून अशा ३ योजना चालवल्या जातात, ज्या अपघातासारख्या परिस्थितीत किंवा तुमच्या अनुपस्थितीत कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचं काम करतात. तसंच वृद्धापळाता उत्पन्नाचं कोणतंही साधन नसेल तर ते आपल्यासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करतात. पाहूया कोणत्या आहेत या योजना.
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना
पहिली योजना म्हणजे पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना. ही टर्म इन्शुरन्स योजना आहे जी आपल्या अनुपस्थितीत आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना २ लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. जर एखाद्या व्यक्तीला सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला वार्षिक केवळ ४३६ रुपये भरून ही योजनेचा लाभ घेता येतो. ४३६/१२ = ३६.३ म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीनं दरमहा सुमारे ३६ रुपयांची बचत केली तर तो आरामात त्याचा वार्षिक प्रीमियम भरू शकतो. १८ ते ५० वयोगटातील कोणीही हा विमा प्लॅन खरेदी करू शकतो.
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना
दुसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. या योजनेचा फायदा विशेषत: आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि खाजगी विमा कंपन्यांचे हप्ते भरणं परवडत नाही अशा लोकांना होऊ शकतो. २०१५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या सुरक्षा विमा योजनेत अपघात झाल्यास २ लाखांपर्यंत विमा संरक्षण दिलं जातं. या योजनेचा वार्षिक प्रीमियम केवळ २० रुपये आहे. ही एक अशी रक्कम आहे जी कोणतीही व्यक्ती सहज भरू शकते. अपघातादरम्यान विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम त्याच्या नॉमिनीला दिली जाते. त्याचबरोबर पॉलिसीधारकाला अपंगत्व आल्यास त्याला नियमानुसार १ लाख रुपयांची मदत मिळते. या योजनेचा लाभ वयाच्या १८ ते ७० वर्षांपर्यंत घेता येतो. जर लाभार्थीचे वय ७० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर पंतप्रधान सुरक्षा विमा योजना बंद केली जाईल.
अटल पेन्शन योजना
जनसुरक्षा योजनेतील तिसरी योजना म्हणजे अटल पेन्शन योजना. जर तुम्हालाही तुमच्या वृद्धापकाळात नियमित उत्पन्नाची व्यवस्था करायची असेल तर तुम्ही सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (APY) गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत दरमहा ५,००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. मात्र, तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून असतं. कोणताही भारतीय नागरिक जो करदाता नाही आणि ज्याचं वय १८ वर्षे ते ४० वर्षे आहे तो सरकारच्या या योजनेत योगदान देऊ शकतो. त्यात वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागते. यात वयानुसार प्रीमियम आकारला जातो. तुमचे वय जितकं कमी असेल तितका प्रीमियम नाममात्र असेल.