Tata Group: टाटा समूहातील घड्याळ बनवणारी कंपनी Titan ने दुबईतील एका मोठ्या ज्वेलरी ब्रँडची खरेदी केली आहे. टायटनची उपकंपनी टायटन होल्डिंग्ज इंटरनॅशनल एफझेडसीओने दुबईतील ज्वेलरी ब्रँड दमास एलएलसी (यूएई) मध्ये ६७% हिस्सा खरेदी करुन त्याची मालकी स्वतःकडे घेतली आहे. १९०७ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी जागतिक स्तरावर पोहोचण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत टायटनचा हा करार एक मैलाचा दगड ठरणार आहे.
किती कोटीत झाला सौदा?
टायटनचा हा करार जागतिक स्तरावरील सर्वात महागडा करार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टायटनने हा ज्वेलरी ब्रँड तब्बल १०३८ दशलक्ष दिरहम, म्हणजेच २,३५७.२५ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. इतक्या महागड्या डीलमागे ज्वेलरी ब्रँडची लोकप्रियता आहे. दमास ज्वेलर्स हे रिटेल श्रेणीतील एक मोठे नाव आहे. ही मध्य पूर्वेतील सर्वात मोठी ज्वेलरी ब्रँड कंपनी असून, त्यांचे दुबई, सौदी अरेबिया, कतार, ओमान, कुवेत, बहरीन सारख्या देशांमध्ये १४६ स्टोअर्स आहेत.
या करारातून टायटनला काय मिळणार?
टाटाचा हा ब्रँड घड्याळांचा व्यवसाय करतो. तनिष्क ज्वेलरी या ब्रँड अंतर्गत हा येतो. तनिष्कचे यश पाहून ते आखाती देशांसह अमेरिकेत लॉन्च करण्यात आले आहे. परदेशात तनिष्कच्या यशानंतर, आता टायटन आपला ज्वेलरी ब्रँड जागतिक बनवण्यात गुंतला आहे. जागतिक बाजारपेठेत दागिन्यांच्या व्यवसायाची गती वाढवण्यासाठी टायटनने दमास विकत घेतले आहे. या कराराद्वारे, कंपनी जगभरात आपला ज्वेलरी ब्रँड वाढवण्याची तयारी करत आहे.
इतर कंपन्यांना मोठा धक्का
टायटनच्या या करारामुळे, रिलायन्सच्या रिलायन्स गोल्ड, मलबार गोल्ड, कल्याण ज्वेलर्स सारख्या दिग्गज कंपन्यांचा ताण वाढणार आहे. कारण, या कंपन्यांचा जागतिक ज्वेलरी क्षेत्रात आधीपासूनच मोठा ग्राहवर्ग आहे. अशा परिस्थितीत, टाटा या ब्रँड्सना मोठी टक्कर देऊ शकतो.