Smart Investment : आजच्या धावपळीच्या जीवनात चांगली कमाई म्हणजेच सुरक्षित भविष्य, असा गैरसमज अनेकांच्या मनात आहे. मात्र, अलीकडेच एका अभिनेता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंगात जावे लागल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का दिला. बाहेरून अत्यंत यशस्वी दिसणारे लोकसुद्धा कधी कधी आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या विळख्यात सापडू शकतात, ही कटू वस्तुस्थिती या घटनेतून समोर आली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
ही घटना सर्वसामान्यांसाठी एक मोठा धडा आहे. नियमित उत्पन्न थांबल्यानंतरही रोजचे खर्च मात्र थांबत नाहीत. अशा वेळी आर्थिक नियोजनाचा अभाव गंभीर समस्या निर्माण करू शकतात. म्हणूनच निवृत्तीनंतर शांत आणि सन्मानजनक जीवन जगण्यासाठी योग्य वेळी योग्य गुंतवणूक करणे अत्यंत गरजेचे आहे.
रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे फक्त बचत नव्हे...
बहुतेक तरुण वयाच्या तिशीत असताना रिटायरमेंट अजून खूप दूर आहे, असे मानतात. मात्र हीच मानसिकता भविष्यात मोठ्या आर्थिक दबावाला कारणीभूत ठरते. रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे केवळ पैसे साठवणे नाही, तर वाढत्या महागाईचा सामना करू शकेल असा मजबूत आर्थिक पाया उभा करणे होय.
उशिरा गुंतवणूक सुरू केल्यास कंपाउंडिंगचा पूर्ण फायदा मिळत नाही. कालांतराने महागाईमुळे रिटायरमेंटसाठी लागणारी रक्कम वाढत जाते. त्यामुळे जितक्या लवकर गुंतवणूक सुरू केली, तितक्या लवकर तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करू लागतात.
५ लाखांच्या गुंतवणुकीतून १.५ कोटींचा फंड...
समजा, तुमचे वय सध्या ३० वर्षे आहे आणि तुम्ही ६० व्या वर्षी निवृत्तीचा विचार करत आहात. म्हणजेच तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी आहे. जर तुम्ही आज म्युच्युअल फंडात एकरकमी ५ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर ही रक्कम भविष्यात मोठे स्वरूप धारण करू शकते.
दरवर्षी सरासरी १२ टक्के परतावा गृहीत धरल्यास, ३० वर्षांनंतर ही गुंतवणूक सुमारे १.५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. वेळ आणि कंपाउंडिंगची ताकद यामुळे छोटी रक्कमसुद्धा निवृत्तीनंतरचा मजबूत आधार बनू शकते.
निवृत्तीनंतर दरमहा १.७५ लाख रुपयांचे नियमित उत्पन्न कसे?
नोकरी संपल्यानंतर गुंतवणुकीचे उद्दिष्ट बदलते. त्या टप्प्यावर भांडवल वाढवण्यापेक्षा सुरक्षित आणि नियमित उत्पन्न अधिक महत्त्वाचे ठरते. यासाठी १.५ कोटी रुपयांचा निधी कंझर्व्हेटिव्ह हायब्रिड म्युच्युअल फंडात ट्रान्सफर करणे हा तुलनेने सुरक्षित पर्याय मानला जातो.
हायब्रिड फंडात इक्विटी आणि डेट यांचे मिश्रण असल्याने जोखीम तुलनेने कमी असते. त्यानंतर सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन (SWP) च्या माध्यमातून दरमहा ठराविक रक्कम काढता येते. समजा, निवृत्तीनंतर या गुंतवणुकीवर सरासरी ८ टक्के वार्षिक परतावा मिळत असेल.
अशा परिस्थितीत, पुढील १० वर्षांपर्यंत दरमहा १.७५ लाख रुपये काढल्यास एकूण सुमारे २.१० कोटी रुपयांची रक्कम मिळू शकते. विशेष म्हणजे, या काळातही परताव्यामुळे मूळ निधी मोठ्या प्रमाणात सुरक्षित राहू शकतो.
लवकर सुरुवात, हाच उपाय
योग्य रणनीती, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि वेळेवर सुरुवात केल्यास निवृत्तीनंतरच्या आर्थिक चिंता मोठ्या प्रमाणात कमी करता येतात. फक्त चांगली कमाई नव्हे, तर दूरदृष्टीने केलेले आर्थिक नियोजनच खऱ्या अर्थाने सुरक्षित भविष्याची हमी देते.
(विशेष सूचना- हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने असून, गुंतवणूकीचा सल्ला समजू नये. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी आर्थतज्ञांचा सल्ला घ्यावा.)
