Silver Price Today: चांदीच्या किमतीत सातत्यानं वाढ होत असून, आज मंगळवार ६ जानेवारी रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळच्या व्यवहारात चांदी १.४१% ने वाढून ₹२,४९,६०० प्रति किलो वर पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळणाऱ्या पाठबळामुळे ही मोठी वाढ दिसून येत आहे. दिल्ली सराफा बाजारातही आज चांदीच्या किमतीत ₹३,००० प्रति किलोपेक्षा जास्त वाढ झाली असून, राजधानीत सध्या चांदीचा भाव ₹२,४८,६१० प्रति किलो आहे.
जागतिक बाजार आणि भू-राजकीय तणाव
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी ५.२% नं वधारून $७६.३७ प्रति औंस वर पोहोचली. २०२५ मध्ये १४७% वाढ नोंदवल्यानंतर चांदीची ही वेगवान वाटचाल सुरूच आहे. अमेरिकेनं चांदीला 'महत्त्वपूर्ण खनिज' म्हणून घोषित केल्यामुळे आणि मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यानं किमतींना आधार मिळत आहे. विशेषतः अमेरिका आणि वेनेझुएला यांच्यातील भू-राजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदीची चमक वाढली आहे. अमेरिकेने वेनेझुएलावर हल्ला करून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली. ज्यामुळे जागतिक अनिश्चितता वाढली आहे. तसंच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबिया आणि मेक्सिकोविरुद्धही संभाव्य कारवाईचे संकेत दिले आहेत.
यावर्षी कमी होणार का पेट्रोल-डिझेलची किंमत? ५० डॉलर्सपर्यंत येऊ शकतात कच्च्या तेलाचे दर
तज्ज्ञांचे मत: गुंतवणूक करावी की नफा कमवावा?
राहुल कलंत्री (मेहता इक्विटीज): वेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांच्या अटकेमुळे भू-राजकीय जोखीम वाढली असून सुरक्षित गुंतवणुकीची मागणी मजबूत झाली आहे.
अनुज गुप्ता (YA वेल्थ): MCX वर चांदीसाठी ₹२,५०,००० ची पातळी हा एक मोठा रेझिस्टंस आहे. जर किंमत या पातळीच्या वर गेली, तर ती ₹२,५५,००० प्रति किलो पर्यंत पोहोचू शकते. ₹२,४२,००० ते ₹२,४०,००० दरम्यान मजबूत सपोर्ट आहे.
पोनमुडी आर (एनरिच मनी): चांदीतील ही तेजी सध्या गुंतवणूक करण्यापेक्षा 'प्रॉफिट बुकिंग' करण्याचे संकेत देत आहे. मात्र, तेजीचा कल कायम असून प्रत्येक घसरणीवर खरेदीचा कल पाहायला मिळत आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
