Silver Market Panic : २०२५ या वर्षात सोन्यापेक्षा चांदीनेगुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. फक्त भारतच नाही तर सध्या चांदीची 'चमक' जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहे. चांदीच्या दराने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले असतानाच, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चांदीच्या विटा एखाद्या भाजीमंडईत विक्रीला ठेवल्याप्रमाणे जमिनीवर पडलेल्या दिसत आहेत. हे दृश्य पाहून लोक चकित झाले असून, चांदी खरेदीसाठी चक्क 'पॅनिक बाइंग' सुरू झाल्याचे चित्र आहे.
कुठे घडला हा प्रकार?
हा व्हायरल व्हिडीओ चीनमधील 'शुबेई' या शहरातील आहे. शुबेई हे चीनमधील सोने आणि दागिन्यांचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते. व्हिडिओमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर सामान नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॉलीतून चांदीच्या मोठ्या विटा उघडपणे नेल्या जात आहेत. पहिल्या नजरेत या विटा बर्फाच्या तुकड्यांसारख्या वाटतात, पण प्रत्यक्षात त्या प्रत्येकी १५ किलो वजनाच्या शुद्ध चांदीच्या विटा आहेत.
एआय आणि चांदीचे नवे समीकरण
चीनमध्ये चांदीच्या मागणीत अचानक एवढी मोठी वाढ का झाली? याचे उत्तर आहे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'. एआय डेटा सेंटर्स आणि हाय-टेक इलेक्ट्रॉनिक्समध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. एआयच्या वाढत्या विस्तारामुळे चांदीची औद्योगिक मागणी प्रचंड वाढली असून, चिनी गुंतवणूकदारांनी आता चांदीचे फंड्स आणि प्रत्यक्ष चांदी खरेदी करण्यावर भर दिला आहे.
A glimpse of 15 kg SGE #Silver slabs selling at the Shuibei (水贝) Shenzhen Luohu District China's premier gold and jewelry hub. pic.twitter.com/mjvzVpxuTR
— Eric Yeung 👍🚀🌕 (@KingKong9888) December 30, 2025
काय आहे SGE मानक?
व्हायरल झालेल्या या विटांवर SGE (Shanghai Gold Exchange) असा शिक्का आहे. याचा अर्थ ही चांदी चीनच्या अधिकृत एक्सचेंजने शुद्ध म्हणून प्रमाणित केली आहे. साधारणपणे १५ किलोच्या विटा या मोठ्या व्यापाऱ्यांसाठी असतात, मात्र सध्या चीनमधील किरकोळ गुंतवणूकदारही आपले पैसे वाचवण्यासाठी चांदीच्या मागे धावत असल्याचे चित्र आहे.
भारतात चांदीचा 'विक्रमी' उच्चांक
जगाच्या पाठीवर डिजिटल गुंतवणुकीचा जोर असला तरी, प्रत्यक्ष धातू खरेदी करण्याची ओढ कमी झालेली नाही. याचे पडसाद भारतीय बाजारातही उमटले आहेत. वर्षाच्या शेवटच्या दिवशी भारतीय बाजारात चांदीने चक्क २.६१ लाख रुपये प्रति किलोग्रामचा टप्पा ओलांडला आहे. चांदीचा हा वेग पाहता आगामी काळात हे दर कुठे जाऊन थांबतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
