Silver Price Today: विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतर चांदीचे भाव आता कमी होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोमवारी चांदीचा भाव ८२.६७० डॉलर प्रति औंस या पातळीवर पोहोचला होता, जो शुक्रवारी ७१.३०० डॉलर प्रति औंसवर खाली आला आहे. म्हणजेच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीच्या किमतीत प्रति औंस ११.३७ डॉलरची घसरण नोंदवण्यात आली आहे. हे प्रमाण विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत १३.७५ टक्क्यांनी कमी आहे. दरम्यान, चांदीच्या बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचं असं मत आहे की, याचे दर ६० टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतात.
चांदीचे भाव का वाढत होते?
चांदीसाठी २०२५ हे वर्ष अतिशय जबरदस्त राहिलं होतं. या काळात चांदीचे दर १८० टक्क्यांनी वाढले होते. सॅमसंगच्या एका घोषणेलाही चांदीच्या किमतीतील वाढीचं कारण मानलं जात आहे. सॅमसंगने लिथियम आयन बॅटरीच्या जागी 'सॉलिड स्टेट बॅटरी'चा पर्याय शोधला आहे, ज्यामध्ये चांदीचा वापर केला जाणार आहे.
चुकीच्या UPI आयडीवर पैसे पाठवले गेले? घाबरू नका, 'या' सोप्या पद्धतीने मिळवा पैसे परत
याशिवाय, पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळेही चांदीच्या किमतीत तेजी पाहायला मिळाली. चीनने १ जानेवारी २०२६ पासून चांदीच्या निर्यातीवर एक प्रकारे बंदीच घातली आहे. चीनच्या नियमांमुळे तिथल्या कंपन्यांना आता चांदीची निर्यात करणे कठीण झाले आहे. काही तज्ज्ञांच्या मते, या घसरणीमागे 'नफावसुली' (Profit Booking) हे देखील एक कारण आहे. दीर्घकाळापासून चांदी विकत घेऊन ठेवलेले गुंतवणूकदार आता तिची विक्री करत आहेत.
तज्ज्ञांचं मत काय?
चांदीच्या बाजाराचं विश्लेषण करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, औद्योगिक मागणीमुळे चांदीने विक्रमी उच्चांक गाठला होता. परंतु, ही परिस्थिती सावध करणारी होती. उद्योगांनी आता चांदीला पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. फोटोव्होल्टेइक सेल्स आणि सोलर पॅनेल उद्योगानं आधीच तांब्याच्या वापराकडे पावलं वळवली आहेत.
चांदी ६० टक्क्यांनी स्वस्त होऊ शकते
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, चांदीचे भाव आपल्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. जर संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 'शॉर्ट कव्हरिंग' झाले, तर फेब्रुवारी २०२६ मध्ये चांदी १०० डॉलर प्रति औंसच्या पातळीवर जाऊ शकते. मात्र, आर्थिक वर्ष २०२७ मध्ये हा धातू मोठ्या दबावाखाली राहील. ज्यामुळे आर्थिक वर्ष २०२७ च्या अखेरीस चांदीचे दर ६० टक्क्यांपर्यंत कोसळू शकतात.
