एफडीमधील गुंतवणूक अनेक जण सुरक्षित मानतात. याचं कारण म्हणजे शेअर बाजाराप्रमाणे यात जोखीम नाही. गुंतवणूकदारांना ठराविक व्याजासह परतावा मिळतो. त्याचबरोबर असे अनेक गुंतवणूकदार आहेत ज्यांना गुंतवणुकीवर जोखीम पत्करायची नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी एफडी हाही एक चांगला पर्याय आहे.
अनेक बँका एफडीवर चांगला परतावा देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना सामान्य गुंतवणूकदारांपेक्षा जास्त व्याज मिळतं. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. सध्या काही बँका ज्येष्ठ नागरिकांना (६० वर्षांवरील व्यक्ती) तीन वर्षांच्या एफडीवर ८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज दर देतात.
टॅक्स बेनिफिट्स
ज्येष्ठ नागरिकांनाही एफडीतील गुंतवणुकीवर इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते. आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास आयकरात १.५० लाख रुपयांपर्यंत वजावट मिळू शकते. मात्र, ज्या एफडीचा लॉक-इन कालावधी ५ वर्षांचा आहे, अशा एफडीवर ही सूट उपलब्ध आहे.
कोणती बँक किती व्याज देते?
अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर चांगले व्याज देत आहेत. हा व्याजदर ८ टक्क्यांपेक्षा जास्त असून या बँकांमध्ये खासगी क्षेत्रापासून ते सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश आहे.
अॅक्सिस बँक
खासगी क्षेत्रातील ही बँक ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक ७.६ टक्के दरानं व्याज देत आहे. जर तुम्ही या बँकेत १ लाख रुपयांची एफडी केली तर तुम्हाला वर्षभरात १,०७,८१९ रुपये मिळतील. त्याचबरोबर तीन वर्षांसाठी गुंतवणुकीवर तुम्हाला १,२५,३४० रुपये मिळतील.
बंधन बँक
बंधन बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर चांगला परतावा देत आहे. ही बँक गुंतवणूकदारांना वार्षिक ७.७५ टक्के दरानं व्याज देत आहे. जर तुम्ही या बँकेत १ लाख रुपयांची एफडी केली तर तुम्हाला एका वर्षानंतर १,०७,९७८ रुपये मिळतील. तर तीन वर्षांसाठी एफडी ठेवल्यास तुम्हाला १,२५,८९५ रुपये मिळतील.
आरबीएल बँक
खासगी क्षेत्रातील बँक ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक ८ टक्के दरानं व्याज देत आहे. जर तुम्ही या बँकेत एक वर्षासाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला १,०८,२४३ रुपये मिळतील. तीन वर्षांत ही गुंतवणूक वाढून १,२६,८२४ रुपये होईल.
डीसीबी बँक
ही बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहे. या बँकेचा वार्षिक व्याजदर ८.०५ टक्के आहे. या बँकेत एक लाख रुपयांच्या एफडीनंतर ही रक्कम १,०८,२९६ रुपये होईल. तर, तीन वर्षांच्या एफडीवर ही रक्कम वाढून १,२७,०११ रुपये होईल.