SBI Fixed Deposit Scheme: जेव्हा जेव्हा पैसे गुंतवण्याची वेळ येते तेव्हा बहुतेक लोक पैशांची एफडी करण्याचा विचार करतात. कारण एफडीमध्ये पैसे गुंतवून पैसे गमावण्याची भीती नसते. यासोबतच एफडीमध्ये मिळणारा परतावाही निश्चित असतो. हेच कारण आहे की बहुतेक गुंतवणूकदार एफडीमध्येच पैसे गुंतवतात.
एफडीमधील गुंतवणुकीचा व्याजदर बँकांनुसार वेगवेगळा असतो. अशावेळी तुम्ही तुमचे पैसे सर्वाधिक व्याजदर असलेल्या एफडीमध्ये गुंतवावेत. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयबद्दल बोलायचं झालं तर एसबीआय आपल्या ग्राहकांना एफडीमध्ये खूप चांगला व्याजदर देते. चला जाणून घेऊया एसबीआयमधील एफडीचे व्याजदर.
एसबीआय एफडी व्याजदर
एसबीआयमध्ये वेगवेगळ्या कालावधीतील एफडीचे व्याजदर ३.५० टक्क्यांपासून ७.२५ टक्क्यांपर्यंत आहेत. याशिवाय एसबीआयकडून काही खास एफडीही चालवल्या जात आहेत. यात एसबीआयच्या ४०० दिवसांच्या एफडीचा समावेश आहे. ही एफडी एसबीआय अमृत कलश एफडी स्कीम म्हणून ओळखली जाते.
५ लाखांच्या गुंतवणुकीवर किती परतावा?
एसबीआयच्या अमृत कलश एफडी योजनेत म्हणजेच ४०० दिवसांच्या कालावधीच्या एफडीमध्ये ५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास सामान्य नागरिकांना ७.१० टक्के दरानं परतावा मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के दरानं परतावा मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मॅच्युरिटीवर ५,४०,०८९ रुपये मिळणार आहेत. तर, ज्येष्ठ नागरिकांना मुदतपूर्तीवर ५,४३,००३ रुपये मिळतील.