चंद्रकांत दडस, वरिष्ठ उपसंपादक
जर तुमचा पगार ३० हजार रुपये असेल, त्यापैकी खोलीभाडे ८ हजार आणि जेवण, खरेदी, प्रवास, चित्रपट, क्रेडिट कार्ड बिलावर १२ हजार रुपये खर्च होत असतील, तर तुमच्याकडे महिन्याला सुमारे १० हजार रुपये बचत किंवा गुंतवणुकीसाठी उरतात. आता ही रक्कम शहाणपणाने कशी वापरायची ते पाहूया.
पायरी १ : आपत्कालीन निधी तयार करा
मासिक खर्च : २०,००० रुपये (भाडे जीवनशैली खर्च)
६ महिन्यांसाठी फंड : १,२०,००० रुपये
आपत्कालीन निधीसाठी एसआयपी : २,००० रुपये
लागणारा कालावधी : ६० महिने
गुंतवणुकीसाठी शिल्लक रक्कम : ८,००० रुपये
पायरी २ : स्वतःचा आरोग्य विमा घ्या
कंपनीकडून मिळणाऱ्या ग्रुप इन्शुरन्सवर पूर्ण विश्वास ठेवू नका. नोकरी बदलल्यावर तो कव्हर संपतो. २५ वर्षांच्या वयात ५ लाख रुपयांचा वैयक्तिक आरोग्य विमा फक्त ८ ते १० हजार रुपयांत मिळू शकतो. म्हणजेच दरमहा सुमारे ७५० ते ८०० रुपये. ब्रोकरऐवजी थेट कंपनीच्या वेबसाइटवरून पॉलिसी घ्या. ती स्वस्त आणि पारदर्शक राहते.
पायरी ३ : टर्म इन्शुरन्स घ्या
जरी तुमच्यावर कोणी अवलंबून नसेल, तरी टर्म इन्शुरन्स घेणे योग्य आहे.
वय कमी असताना प्रीमियम कमी मिळतो आणि तो कायम एकसारखा राहतो. यामुळे पुढील काळात मोठा फायदा होतो.
पायरी ४ : कोणत्या फंडांमध्ये गुंतवणूक कराल?
आता उरलेल्या ८ हजार रुपयांची गुंतवणूक करा. ही रक्कम लार्ज आणि मिड-कॅप फंड, स्मॉल-कॅप फंड आणि फ्लेक्सिकॅप फंडमध्ये विभागा.
गेल्या पाच वर्षांत सतत चांगला परतावा दिलेले आणि कमी खर्चाचे फंड निवडा. ‘रेग्युलर’ योजनांऐवजी ‘डायरेक्ट’ योजनांमध्ये गुंतवणूक करा. असे सातत्य ठेवल्यास, वर्षानिहाय थोडी थोडी गुंतवणूक वाढवत गेल्यास तुम्ही वयाच्या ५० व्या वर्षी तब्बल १ कोटी ५० लाख रुपयांपेक्षा जास्त फंड जमा करू शकता.