PPF vs FD: जर तुम्हाला तुमचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवायचा असेल आणि तुम्ही पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) किंवा फिक्स्ड डिपॉझिट (FD) यापैकी कोणता चांगला आहे, याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हे दोन्ही सुरक्षित गुंतवणुकीचे मार्ग आहेत आणि निश्चित व्याज देतात, परंतु त्यांच्यात अनेक फरक आहेत. पीपीएफ दीर्घकाळ बचत आणि कर सवलतीसाठी चांगला आहे, तर एफडी अल्प किंवा मध्यम मुदतीसाठी आणि लवकर पैसे काढण्याची सोय देते. कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य असेल, हे समजून घेऊया.
पीपीएफमध्येगुंतवणूक करण्याचे फायदे
पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ ही एक सरकारी योजना आहे, जी दीर्घकाळ बचतीसाठी तयार करण्यात आली आहे. लोकांची बचत व्हावी आणि त्यांना कर वाचविण्यात मदत मिळावी, हा याचा उद्देश आहे. पीपीएफ खात्याची मुदत १५ वर्षांची असते, जी तुम्ही ५-५ वर्षांसाठी वाढवू शकता. यामध्ये दरवर्षी कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतात.
पीपीएफचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यावर मिळणारी कर सवलत. यात जमा केलेली रक्कम, व्याज आणि मुदतपूर्तीची रक्कम, या तिन्हीवर कोणताही कर लागत नाही. याला 'ईईई' (Exempt-Exempt-Exempt) श्रेणी म्हणतात. तुम्ही ६ वर्षांनंतर अंशतः पैसे काढू शकता. मुलांचे शिक्षण, लग्न किंवा घर खरेदी यांसारख्या मोठ्या उद्दिष्टांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे
तर, फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडी ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये केली जाणारी गुंतवणूक आहे. यामध्ये तुम्ही एकाच वेळी पैसे जमा करता आणि निश्चित व्याजदरानं कमाई होते. खातं उघडताना व्याजदर निश्चित होतो, जो बाजारातील चढ-उतारांनंतरही बदलत नाही. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही मुदतपूर्तीवर संपूर्ण व्याज घेऊ शकता किंवा दर महिन्याला हप्त्यांमध्ये घेऊ शकता. एफडीचा कालावधी ७ दिवसांपासून १० वर्षांपर्यंत असू शकतो, ज्यामुळे तुम्हाला लवचिकता मिळते. जर तुम्हाला लवकर पैसे काढायचे असतील, तर थोडा दंड भरून काढू शकता. ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त व्याज मिळतं, जे ०.५ ते ०.७५ टक्के पर्यंत अतिरिक्त असू शकतं. 'टॅक्स सेव्हर एफडी' मध्ये ५ वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो आणि १.५ लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते, परंतु व्याजावर कर भरावा लागतो.
दोघांमध्येही धोका कमी असतो
पीपीएफ त्या लोकांसाठी चांगला आहे, ज्यांना दीर्घकाळ पैसा सुरक्षित ठेवायचा आहे आणि कर वाचवायचा आहे. निवृत्तीसाठी किंवा मोठ्या उद्दिष्टांसाठी हा योग्य आहे. पण जर तुम्हाला कमी वेळेसाठी गुंतवणूक करायची असेल किंवा लवकर पैसे काढण्याची गरज असेल, तर एफडी (FD) उत्तम आहे. एफडीमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार कालावधी निवडू शकता आणि नियमित उत्पन्नासाठी मासिक व्याज देखील घेऊ शकता. या दोन्हीमध्ये धोका कमी आहे, परंतु परताव्याच्या (रिटर्न) बाबतीत बाजाराशी जोडलेल्या गुंतवणुका जास्त नफा देऊ शकतात, पण त्यात धोकाही जास्त असतो.
तुमच्यासाठी योग्य पर्याय तुमच्या गरजांवर अवलंबून असतो. जर तुम्ही १५ वर्षांपर्यंत पैसे लॉक करू शकत असाल आणि कर सवलत (Tax Exemption) हवी असेल, तर पीपीएफ निवडा. जर तुम्हाला लवचिकता आणि लवकर पैसे काढण्याची सोय हवी असेल, तर एफडी योग्य राहील. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची आर्थिक स्थिती आणि लक्ष्ये नक्की पाहा. हे दोन्ही सुरक्षित आहेत, पण योग्य नियोजन केल्यास तुमचा पैसा अधिक फायदा देऊ शकतो.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)