PPF Investment Scheme: पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ (PPF) ही एक सरकारी योजना आहे, जिथे लोक आपली छोटी-छोटी बचत गुंतवू शकतात आणि चांगल्या दरानं परतावा मिळवू शकतात. पीपीएफ ही सरकारी योजना असल्यामुळे यात गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतात आणि यामध्ये जोखीम शून्य असते. जर तुम्ही देखील तुमच्या पैशांच्या गुंतवणुकीसाठी अशा योजनेच्या शोधात असाल जिथे तुम्ही थोडी-थोडी गुंतवणूक करून मोठा निधी उभा करू शकता, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
किमान ५०० रुपयांची गुंतवणूक
पीपीएफ योजनेचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांचा असतो आणि या दरम्यान गुंतवणूकदारांना दरवर्षी किमान रक्कम गुंतवणे आवश्यक असते. या योजनेत वार्षिक किमान ५०० रुपयांची गुंतवणूक करावी लागते, तर गुंतवणुकीची कमाल मर्यादा १.५० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. पीपीएफ योजनेत वार्षिक ७.१ टक्के व्याजदरानं परतावा मिळतो. १५ वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदाराला हवं असल्यास तो ५-५ वर्षांसाठी दोनदा हा कालावधी वाढवू शकतो, अशा प्रकारे २५ वर्षांपर्यंत येथे गुंतवणूक केली जाऊ शकते. जर गुंतवणूकदाराने मॅच्युरिटीनंतर पैसे काढले नाही, तर त्याला ७.१ टक्के दरानं व्याज मिळत राहतं.
जमा होईल १३ लाखांचा फंड
जर तुम्ही पीपीएफ योजनेत दरमहा ४००० रुपये वाचवून वर्षाला ४८,००० रुपये गुंतवले आणि ही गुंतवणूक १५ वर्षांपर्यंत सुरू ठेवली, तर तुमची एकूण गुंतवणूक ७.२० लाख रुपये होईल. मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण १३.०१ लाख रुपये मिळतील, ज्यामध्ये ५.८१ लाख रुपयांचा थेट नफा समाविष्ट असेल. जर तुम्ही १५ वर्षांनंतर तुमची ही गुंतवणूक पुढील १० वर्षांसाठी सुरू ठेवली, तर तुम्हाला ३२.९८ लाख रुपयांचा मोठा निधी मिळेल आणि अशा प्रकारे तुम्हाला एकूण २०.९८ लाख रुपयांचा नफा होईल.
