प्रसिद्ध पुस्तक ‘रिच डॅड पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचे मत आहे की, बहुतेक लोक नशिबामुळे नव्हे, तर पैशांचे मूलभूत नियम समजून न घेतल्यामुळे गरीब राहतात. जास्त कमाई करण्याच्या विचारात लोक अडकून पडतात; मात्र संपत्ती निर्माण करण्यामागील खरे तत्त्वे दुर्लक्षित करतात. कियोसाकी यांच्या मते, दोन महत्त्वाचे मनी लॉ दुर्लक्षित केल्यास व्यक्ती दीर्घकाळ गरीबीच्या चक्रात अडकू शकते.
‘वाईट पैसा’ चांगल्या पैशाला बाजूला सारतो
कियोसाकी यांनी पहिला नियम म्हणून ग्रेशम लॉचा उल्लेख केला आहे. या सिद्धांतानुसार, जेव्हा अर्थव्यवस्थेत कमजोर किंवा ‘वाईट’ चलन वाढते, तेव्हा वास्तविक मूल्य असलेल्या मजबूत मालमत्ता बाजारातून हळूहळू गायब होतात. त्यांच्या मते, आज अनेक लोक जलद मूल्य गमावणाऱ्या चलनात (फेक मनी) बचत करत आहेत. त्याऐवजी सोने, चांदी आणि बिटकॉइनसारख्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणे अधिक योग्य ठरू शकते. कियोसाकी यापूर्वीही सांगत आले आहेत की, केवळ पारंपरिक बचतीवर अवलंबून राहणाऱ्यांना दीर्घकालीन नुकसान होऊ शकते, कारण महागाई बचतीची खरेदीशक्ती कमी करते.
नेटवर्कची ताकद म्हणजे संपत्ती
दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे मेटकाफ लॉ, जो नेटवर्कच्या सामर्थ्यावर आधारित आहे. कियोसाकी सांगतात की, मोठ्या फ्रेंचायझी कंपन्या यशस्वी होण्यामागे त्यांचे भक्कम नेटवर्क हेच मुख्य कारण असते. याच तत्त्वावर ते गुंतवणूक करताना अशा क्रिप्टोकरन्सीकडेच लक्ष देतात, ज्या मागे मजबूत नेटवर्क आहे. बिटकॉइनसारख्या डिजिटल अॅसेटची खरी ताकद त्याच्या विस्तृत आणि मजबूत नेटवर्कमध्ये असल्याचे ते नमूद करतात. गुंतवणूक करताना भविष्यात एखादा श्रीमंत किंवा मोठा गुंतवणूकदार तो अॅसेट खरेदी करेल का, हा विचार महत्त्वाचा असल्याचेही ते सांगतात.
गुंतवणुकीपूर्वी नियम समजून घ्या
कियोसाकींच्या मते, फक्त जास्त कमाई पुरेशी नाही, तर योग्य अॅसेटची निवड करणे तितकेच आवश्यक आहे. वास्तविक मूल्य आणि मजबूत नेटवर्क असलेल्या अॅसेटमध्ये गुंतवणूक करण्यावर त्यांचा भर आहे. मात्र, कोणतेही आर्थिक निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि स्वतःची जोखीम क्षमता ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही ते स्पष्ट करतात. संपत्ती निर्माणासाठी नियम समजून घेणे आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे, असा कियोसाकी यांचा ठाम संदेश आहे.
