Money Management Tips: महिन्याच्या सुरुवातीला खात्यात पगार जमा होतो, मात्र काही दिवसांतच पैसे संपतात, बचत होतच नाही, अशी अनेकांची तक्रार असते. यामागे कमी उत्पन्न हे एकमेव कारण नसून, योग्य आर्थिक नियोजनाचा अभाव आणि चुकीचे मनी मॅनेजमेंट हे मुख्य कारण असू शकते. योग्य नियोजन आणि सवयी बदलल्यास आर्थिक स्थितीत मोठा बदल होऊ शकतो.
खर्चाची नोंद ठेवणे हा पहिला टप्पा
पैशांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दर महिन्याला उत्पन्न आणि खर्च याची पूर्ण नोंद ठेवणे. फक्त मोठे खर्च नाही तर चहा, नाश्ता, ऑनलाइन खरेदी यांसारखे छोटे खर्चही लिहून ठेवणे आवश्यक आहे. हे छोटे खर्चच आपले बजेट बिघडवतात. यासाठी मोबाईल अॅप, नोटपॅड किंवा एक्सेल शीटचा वापर करता येतो. महिन्याच्या शेवटी खर्चाचा आढावा घेतल्यास अनावश्यक खर्च कमी करता येतो.
बजेट तयार करा आणि त्याचे पालनही करा
दर महिन्याच्या सुरुवातीला बजेट तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या उत्पन्नाचे वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजन करावे.
उदाहरणार्थ:
आवश्यक खर्च
प्रवास खर्च
मनोरंजन / फिरणे
बचत
इतर खर्च
आधीच ठरवलेले असल्यामुळे अनावश्यक खर्च टाळणे सोपे होते.
कर्ज नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे
जर कर्ज घेतले असेल, तर त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम जास्त व्याजदर असलेले कर्ज फेडण्यावर भर द्यावा, जसे की क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन. तसेच अनावश्यक कर्ज घेणे टाळावे. तज्ज्ञांच्या मते, एकूण EMI ही उत्पन्नाच्या २० ते ३० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. यामुळे आर्थिक ताण कमी राहतो.
इमर्जन्सी फंड तयार करा
आजच्या काळात अचानक खर्च येऊ शकतात, जसे की:
नोकरी जाणे
व्यवसायात नुकसान
वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती
अशा वेळी आर्थिक अडचण टाळण्यासाठी किमान ६ महिन्यांच्या खर्चाइतका इमर्जन्सी फंड तयार ठेवावा, असा आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला आहे. अशाप्रकारे योग्य आर्थिक नियोजन, खर्चावर नियंत्रण, कर्ज व्यवस्थापन आणि इमर्जन्सी फंड तयार केल्यास पगारातून बचत करणे शक्य आहे. मनी मॅनेजमेंटच्या सवयी बदलल्यास आर्थिक स्थैर्य मिळू शकते.
