Small Savings Scheme: जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजना आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) सारख्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल ते जून या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदराबाबत सरकारनं घोषणा केलीये. सरकारनं सध्याचे व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. सलग पाचव्या तिमाहीत अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
काय म्हटलंय अर्थ मंत्रालयानं?
१ एप्रिल २०२५ पासून ते ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी विविध लघुबचत योजनांवरील व्याजदर आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या मार्च तिमाहीच्या दरांइतकेच राहतील, असं अर्थ मंत्रालयानं एका अधिसूचनेत म्हटलंय. सरकारनं २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीसाठी काही योजनांच्या व्याजदरात शेवटचा बदल केला होता. सरकार दर तिमाहीला अल्पबचत योजनांवरील व्याजदर जाहीर करते.
इलॉन मस्क यांनी X ला xAI ला विकलं, अखेर का घेतला त्यांनी हा मोठा निर्णय?
कोणत्या योजनेवर किती व्याजदर?
सुकन्या समृद्धी योजनेवरील ठेवींवर ८.२ टक्के, तर तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर चालू तिमाहीत ७.१ टक्के व्याज दर कायम राहणार आहे. लोकप्रिय असलेल्या पीपीएफ आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग डिपॉझिट योजनांचे व्याजदरही पुढील तिमाहीसाठी अनुक्रमे ७.१ टक्के आणि ४ टक्के कायम ठेवण्यात आलेत. किसान विकास पत्रावरील व्याजदर ७.५ टक्के राहील आणि गुंतवणूक ११५ महिन्यांत मॅच्युअर होईल. एप्रिल ते जून २०२५ या कालावधीसाठी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील (एनएससी) व्याजदर ७.७ टक्के राहील. चालू तिमाहीप्रमाणेच मासिक उत्पन्न योजनेतही गुंतवणूकदारांना ७.४ टक्के उत्पन्न मिळणार आहे.
कपातीचीही होती भीती
रिझर्व्ह बँकेनं गेल्या फेब्रुवारी महिन्यात रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली होती. या कपातीनंतर रेपो रेट ६.२५ टक्के होता. आरबीआयच्या या निर्णयानंतर अल्पबचत योजनांचे व्याजदर कमी होतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, सरकारनं आगामी तिमाहीसाठी कोणताही बदल केलेला नाही.