Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमध्येगुंतवणूक हा आजच्या काळात सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय ठरत असला, तरी या गुंतवणुकीवर आकारले जाणारे छुपे (हिडन) चार्जेस हळूहळू गुंतवणूकदारांची संपत्ती कमी करत असल्याचे समोर आले आहे. तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन गुंतवणुकीत हे लपलेले खर्च 25 टक्क्यांपर्यंत नफा कमी करतात.
गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडमध्ये SIP, तसेच एकरकमी (लंपसम) गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, फंड हाऊसेस, वितरक आणि सरकारकडून आकारले जाणारे विविध प्रकारचे चार्जेस बहुतांश गुंतवणूकदारांच्या लक्षात येत नाहीत. हे चार्जेस थेट वेगळे वसूल न करता NAV (नेट अॅसेट व्हॅल्यू) मध्ये समाविष्ट केले जातात, त्यामुळे गुंतवणूकदारांना प्रत्यक्षात किती खर्च लागत आहे याची जाणीव होत नाही.
म्युच्युअल फंडमधील प्रमुख हिडन चार्जेस
एक्स्पेन्स रेशो- सर्वात मोठा लपलेला खर्च
हा म्युच्युअल फंडमधील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा खर्च मानला जातो. फंड व्यवस्थापन, फंड मॅनेजरची फी, मार्केटिंग आणि प्रशासकीय खर्च यासाठी हा चार्ज आकारला जातो.
उदाहरण : जर एखादा फंड 12% परतावा देत असेल आणि एक्स्पेन्स रेशो 2% असेल, तर गुंतवणूकदाराला प्रत्यक्षात फक्त 10% परतावा मिळतो.
एक्झिट लोड
ठराविक कालावधीपूर्वी गुंतवणूक काढून घेतल्यास एक्झिट लोड आकारला जातो. साधारणपणे हा चार्ज 1% असतो आणि गुंतवणूक केल्यानंतर 6 महिने किंवा 1 वर्षाच्या आत पैसे काढल्यास लागू होतो.
पोर्टफोलिओ टर्नओव्हर कॉस्ट
फंड मॅनेजर वारंवार शेअर्सची खरेदी-विक्री करत असल्यास ब्रोकरेज, STT आणि करांचा खर्च वाढतो. हा खर्च थेट दिसत नाही, पण तो गुंतवणूकदाराच्या रिटर्नवर परिणाम करतो.
कॅश ड्रॅग
काही फंड हाऊसेस पोर्टफोलिओतील एक भाग रोख स्वरूपात ठेवतात. मार्केट तेजीमध्ये असताना हा पैसा गुंतवलेला नसल्याने अपेक्षित परतावा मिळत नाही. हा देखील एक अप्रत्यक्ष खर्च आहे.
ट्रॅकिंग एरर (इंडेक्स फंड / ETF मध्ये)
इंडेक्स फंड किंवा ETF ने नेहमीच इंडेक्ससारखी कामगिरी होईलच असे नाही. Expense Ratio आणि व्यवस्थापनातील अकार्यक्षमता यामुळे परतावा इंडेक्सपेक्षा कमी राहू शकतो.
रेग्युलर प्लॅनमधील अतिरिक्त कमिशन
रेग्युलर प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास वितरकाचे (डिस्ट्रीब्युटर) कमिशन आकारले जाते. हे कमिशन डायरेक्ट प्लॅनपेक्षा 0.5% ते 1% जास्त असते. दीर्घकालीन गुंतवणुकीत हा फरक मोठ्या नुकसानीत बदलू शकतो.
कर
दीर्घकालीन गुंतवणूक विकल्यास Long Term Capital Gains Tax (LTCG), अल्पकालीन गुंतवणूक विकल्यास Short Term Capital Gains Tax (STCG) आणि डिव्हिडंडवरही कर लागू असातत. हे सर्व कर एकत्रितपणे गुंतवणूकदाराचा निव्वळ परतावा कमी करतात.
दीर्घकालीन परिणाम धोकादायक
तज्ज्ञांच्या मते, फक्त 1% अतिरिक्त खर्च देखील 20 वर्षांत गुंतवणूकदाराची वेल्थ 25 ते 30 टक्क्यांनी कमी करू शकतो. अलीकडेच ‘1 फायनान्स रिसर्च’च्या अभ्यासात असे आढळून आले की, रेग्युलर म्युच्युअल फंड योजनांमधील लपलेल्या कमिशनमुळे गुंतवणूकदारांचा एक चतुर्थांश नफा कमी होतो.
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा सल्ला
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना केवळ परताव्याकडे लक्ष न देता, एक्स्पेन्स रेशो, डायरेक्ट वि. रेग्युलर प्लॅन, एक्झिट लोड आणि कर परिणाम यांची सखोल माहिती घेणे अत्यावश्यक आहे.
(टीप : कोणताही शेअर किंवा म्युच्युअल फंड खरेदी करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे हितावह ठरेल.)
