निमेश चंदन,
मुख्य गुंतवणूक अधिकारी, बजाज फिन्सर्व्ह एएमसी
“ही कथा ऐकल्या शिवाय, स्वर्गातील जीवनसुद्धा रक्तरंजित रणभूमीच ठरेल. पण ही कथा जर ऐकली असली, तर पृथ्वीवरील जीवन रंगभूमी बनेल, सर्वांना मोहून टाकणारा एक सुंदर मंच.” – व्यास यांनी आपल्या नवजात पुत्र शुकाला सांगितले.
देवदत्त पटनाईक यांच्या “श्याम” या पुस्तकाची सुरुवात व्यास आणि वटीका यांच्या पुत्र शुकाच्या जन्मकथेतून होते. आईच्या गर्भात असतानाच शुकाला अद्भुतरीत्या पृथ्वीवरील जीवनाविषयी ज्ञान प्राप्त होते. मात्र, पृथ्वीवरील दुःख आणि कठीण परिस्थिती ऐकून तो नाराज होतो आणि जन्म घेताच आकाशाच्या दिशेने प्रवास करू लागतो. त्यावेळी त्याचे वडील व्यास त्याला थांबवतात आणि सांगतात की, श्रीकृष्णाची कथा ऐकल्यानंतरच त्याने ठरवावे – त्याला स्वर्गात राहायचं आहे की पृथ्वीवर. व्यास म्हणतात की, श्रीकृष्णाची कथा ऐकली की मनुष्य जगाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतो – रणभूमीप्रमाणे नव्हे, तर रंगभूमीप्रमाणे; जिथे तो पृथ्वीवरील सुंदर आणि फलदायी जीवनाचे मोल जाणू लागतो.
गुंतवणुकीचा प्रवास, अगदी जीवनाच्या प्रवासाप्रमाणेच, शेवटी दृष्टीकोन आणि आपण निवडलेल्या मार्गावर अवलंबून असतो. अल्पकालीन दृष्टीकोनातून पाहिल्यास गुंतवणूक ही रणभूमीसारखी वाटते - प्रत्येक बदल, ट्वीट किंवा हालचालीला तत्काळ प्रतिसाद द्यावा लागणारी स्पर्धात्मक जागा. पण जर आपण दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल, तर ती रंगभूमी ठरते — शिकण्याची, प्रगतीची आणि संपत्ती निर्माण करण्याची सुंदर जागा.
भारतीय समभाग बाजाराच्या प्रवासाकडे पाहा: बीएसई सेन्सेक्स 30 निर्देशांकाने 1986 मध्ये प्रथम प्रकाशित झाल्यापासून सुमारे 13.5% वार्षिक चक्रवाढ दराने (CAGR) परतावा दिला आहे. त्यात दरवर्षी सुमारे 1% , उत्पन्न यात समाविष्ट केल्यास, एकूण गुंतवणूक दर प्रत्येक 5 वर्षांनी दुप्पट होऊ शकते. या प्रवासात 10 लोकसभा निवडणुका, 46 केंद्रीय अर्थसंकल्प (अंतरिम अर्थसंकल्पासह), अनेक मोठे आर्थिक संकटे (2008 मधील जागतिक आर्थिक संकटासह), करप्रणाली, आयातशुल्क आणि आर्थिक धोरणांमधील बदल, राजकीय आणि भूराजकीय घडामोडी, तसेच महामारी आणि बाजारावर परिणाम करणारे घोटाळे झाले तरीही भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय उद्योग सतत पुढे चालत राहिले. या सर्व घटनांनंतरही परताव्याचे चक्रवाढीकरण अखंड सुरू राहिले. खरं तर, जर एखाद्या गुंतवणूकदाराने शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या बाजारघटांदरम्यान गुंतवणुकीत वाढ केली असती, तर त्याचे परतावे आणखी जास्त झाले असते.
हे दीर्घकालीन स्थैर्य केवळ व्यापक बाजारपेठेतच नव्हे, तर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्येही दिसून येतो. दीर्घकाळात स्थिर राहणाऱ्या गुंतवणूकदारांना अल्पकालीन अस्थिरता असूनही, या क्षेत्रांमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या चांगला फायदा झाला आहे. बँकिंग आणि वित्तीय सेवांसारखी क्षेत्रे, अल्प कालावधीत अस्थिर दिसू शकतात, ज्यात तीव्र वाढ होते आणि त्यानंतर तितक्याच जलद घसरण दिसून येते. अशा चढ-उतारांनी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पणाला लागतो आणि अनुभवी गुंतवणूकदारांनासुद्धा बाजाराच्या हालचालींची वेळ साधण्याचा मोह होऊ शकतो. जे लोक आवेगाने प्रतिक्रिया देतात, ते वेळेपूर्वी बाहेर पडण्याचा धोका पत्करतात आणि त्यानंतरच्या सुधारणांच्या टप्प्यात संधी गमावतात. तथापि, दीर्घकाळात, ही अस्थिरता वाढीच्या चक्राचा एक अविभाज्य भाग आहे. कर्ज विस्तार आणि डिजिटल स्वीकार ते अर्थव्यवस्थेच्या व्यापक स्वरूपाच्या औपचारिकीकरणासारखे संरचनात्मक घटक संयमी गुंतवणूकदारांना अर्थपूर्ण संपत्ती निर्माण करून पुरस्कृत करतात
तरीही, 1980 च्या दशकापासून आजपर्यंत, दर काही वर्षांनी आपण अशा लोकांच्या गोष्टी ऐकतो जे बाजारातील प्रत्येक चढ-उतारावर व्यवहार करून, मर्यादित मालमत्तेवर उचल घेऊन, जलद नफ्याच्या मागे लागून दीर्घकालीन परतावे गमावतात किंवा “त्वरित परतावा” योजनांच्या आमिषाला बळी पडून बाजारात पैसे गमावतात. या विषयावर औपचारिक संशोधन मर्यादित असले तरी, काही दलाली संस्था आणि बाजार नियामकांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालांनुसार, अल्पकालीन व्यवहारांमधून सातत्याने नफा कमावणाऱ्या व्यापाऱ्यांचे प्रमाण एक आकडी टक्केवारीतच आहे. त्यातसुद्धा, सकारात्मक परतावे मिळविणाऱ्या व्यापाऱ्यांपैकी फक्त काहीच लोक सातत्याने फिक्स्ड डिपॉझिटच्या परताव्यापेक्षा जास्त परतावा मिळवू शकतात.
जरी आपण दुर्मीळ यशस्वी व्यापारी असलात तरी, प्रत्येक दिवस हा रणभूमीप्रमाणे असतो जिथे प्रत्येक हालचालीवर प्रतिक्रिया द्यावी लागते आणि प्रत्येक टक्केवारीच्या तुकड्यासाठी इतर व्यापाऱ्यांशी संघर्ष करावा लागतो. परंतु दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीचा प्रवास ही रंगभूमी असते, आनंददायी आणि फलदायी संपत्ती निर्मितीची प्रक्रिया. आपल्याला फक्त योग्य गुंतवणूक धोरण निवडून त्याला चिकटून राहायचे असते. बाजारातील गोंगाट, अफवा, अल्पकालीन हालचाली, भावना बदल, दैनंदिन विश्लेषण या गोष्टी पाहायला मनोरंजक असल्या तरी त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नसते.
