How to check PF Balance Online : नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओची पीएफ योजना म्हणजे निवृत्तीनंतरचा सर्वात मोठा आधार असतो. त्यामुळे आपल्या पीएफ खात्यात कंपनी पैसे जमा करत आहे की नाही? वेळेवर व्याज मिळते का? खात्यात किती शिल्लक आहे? असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांना मनात असतात. यासाठी पीएफ खात्याची शिल्लक नियमितपणे तपासत राहणे आवश्यक आहे. पीएफ खात्यातील शिल्लक तपासणे खूप सोपे आहे. तुम्ही फक्त मिस्ड कॉलने तुमची पीएफ खात्यातील शिल्लक तपासू शकता.
फक्त एक मिस्ड कॉल द्या
जर तुमचा मोबाईल नंबर UAN वर नोंदणीकृत असेल, तर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून ९९६६०४४४२५ या क्रमांकावर मिस कॉल करून माहिती मिळवू शकता. या नंबरवर मिस्ड कॉल केल्यानंतर, तुम्हाला EPFO कडून काही मॅसेज येतील, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या PF खात्यातील शिल्लक पाहायला मिळेल.
एसएमएसद्वारेही शिल्लत तपासता येईल
मिस्डकॉल व्यतिरिक्त तुम्ही ७७३८२९९८९९ या क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या EPF खात्यातील शिल्लक आणि तुमच्या खात्यातील ताज्या योगदानाची माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला नोंदणीकृत क्रमांकावरून AN EPFOHO ENG टाइप करून संदेश पाठवावा लागेल. ENG याचा अर्थ तुम्हाला इंग्रजी भाषेत माहिती हवी आहे. तुम्हाला ही माहिती मराठी भाषेत जाणून घ्यायची असेल तर त्या भाषेतील पहिली तीन अक्षरे टाईप करा.
EPFO पोर्टलवर मिळतील सर्व प्रश्नांची उत्तरे
तुम्हाला पीएफ शिल्लक व्यतिरिक्त आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही EPFO पोर्टलला भेट देऊन घेऊ शकता. यासाठी EPFO वेबसाइटवर जा आणि कर्मचारी विभागात क्लिक करा आणि नंतर सदस्य पासबुकवर क्लिक करा. तुमचा UAN आणि पासवर्ड टाकून तुम्ही PF पासबुक पाहू शकता. यामध्ये, ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स तसेच कर्मचारी आणि नियोक्ता यांचे योगदान तुम्ही तपासू शकता. कोणत्याही PF हस्तांतरणाची एकूण रक्कम आणि जमा झालेल्या PF व्याजाची रक्कम देखील पाहायला मिळेल.