Investment Plans: केंद्र सरकारकडून गुंतवणुकीच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. सुकन्या समृद्धी योजनाही त्यापैकीच एक आहे. केंद्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू केली असून, त्यावर वार्षिक ८.२ टक्के व्याज मिळत आहे. सुकन्या समृद्धी योजना ही एकमेव अशी योजना आहे ज्यात मुलींसाठीच्या गुंतवणूकीवर ८.२ टक्के व्याज मिळत आहे. याशिवाय कोणत्याही योजनेत मुलींना तेवढं व्याज मिळत नाही. आज आपण येथे सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घेणार आहोत.
सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठीची गुंतवणूक योजना आहे. या योजनेत ज्या मुलींचं वय १० वर्षांपेक्षा कमी आहे त्यांनाच खातं उघडता येतं. या योजनेअंतर्गत दरवर्षी एकरकमी रक्कम जमा केली जाते. ही योजना तुम्ही वार्षिक 250 रुपयांपासून १.५ लाख रुपयांपर्यंत जमा करू शकता. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत एका कुटुंबातील जास्तीत जास्त २ मुलींची खाती उघडता येतात. जर एखाद्या कुटुंबात आधीपासूनच मुलगी असेल आणि आईने जुळ्या मुलींना जन्म दिला असेल तर अशा प्रकरणांमध्ये एका कुटुंबातील ३ मुलींची खाती उघडली जाऊ शकतात.
२१ व्या वर्षी मॅच्युअर होते स्कीम
या योजनेअंतर्गत तुम्हाला १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल आणि खातं उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षांनंतर ही योजना मॅच्युअर होते. जर तुमची मुलगी १८ वर्षांची झाली असेल आणि तुम्हाला तिचं लग्न करायचं असेल तर अशा परिस्थितीत खातं बंद करून सर्व पैसे काढता येतात. या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात तुम्हाला इन्कम टॅक्सचे ३ फायदे मिळतात. योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम, मिळालेलं व्याज आणि काढायची रक्कम हे तिन्हीही पूर्णपणे करमुक्त आहेत.
किती मिळतं व्याज
जर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावानं या योजनेत खातं उघडलं आणि दरवर्षी दीड लाख रुपये जमा केले तर तुमची एकूण गुंतवणूक २२,५०,००० रुपये होईल. खातं मॅच्युअर झाल्यावर तुमच्या मुलीच्या खात्यावर एकूण ६९ लाख २७ हजार ५७८ रुपये जमा होतील. यात ४६ लाख ७७ हजार ५७८ रुपयांच्या व्याजाचा समावेश असेल. लक्षात ठेवा ही एक सरकारी योजना आहे, जी केंद्र सरकारच चालवते. त्यामुळे ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे, ज्यामध्ये तुम्हाला फिक्स्ड आणि गॅरंटीड परतावा मिळतो.