Made in India Semiconductor : गेल्या काही वर्षांपासून सरकारने 'मेड इन इंडिया' उत्पादनांवर विशेष भर दिला आहे. याचाच परिणाम म्हणून, आपले चीनसह इतर देशांवरील अवलंबीत्व लक्षणीयरित्या कमी झाले आहे. विशेष म्हणजे, सेमीकंडक्टर क्षेत्रातही भारत स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. याच क्रमाने येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात जगाला पहिली 'मेड इन इंडिया' सेमीकंडक्टर चिप मिळणार आहे. खुद्द आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (PSMC) च्या भागीदारीमध्ये गुजरातच्या धोलेरा येथे देशातील पहिले सेमीकंडक्टर फॅब तयार करत आहे. या ठिकाणी जगातील पहिली मेड इन इंडिया सेमीकंडक्टर तयार केला जात आहे.
पहिली चिप ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध होईल
आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, केवळ देशालाच नाही तर संपूर्ण जगाला सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये इंडिया मेड सेमीकंडक्टर चिप मिळणार आहे. यासाठी ढोलेरा प्लांटमध्ये काम सुरू आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन यावर भागीदारीत एकत्र काम करत आहेत. हे युनिट मार्च 2024 मध्ये सुरू करण्यात असून, देशातील हा पहिला सेमीकंडक्टर प्लांट आहे. 2026 च्या अखेरीस ही चिप देशात तयार होईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र अश्विनी वैष्णव यांच्या विधानानंतर हे स्पष्ट होते की, देशाला मेड इन इंडिया चिप एक वर्ष आधीच मिळणार आहे.
टाटा समूहाची 91 हजार कोटींची गुंतवणूक
मार्च 2024 च्या अहवालानुसार, टाटा समूहाने 91,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशातील पहिला मेगा सेमीकंडक्टर फॅब प्लांट उभारण्यासाठी धोलेरा येथे सुमारे 160 एकर जमीन आरक्षित केली आहे. यात केंद्र आणि राज्य सरकारदेखील पैसा लावणार असून, धोलेराला अग्रगण्य व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅब बनवण्याचे लक्ष आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि PSMC मधील या उपक्रमामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अंदाजे 20,000 कुशल नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज आहे.