EPFO PF withdrawal with UPI : देशातील कोट्यवधी नोकरदार वर्गासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आतापर्यंत 'पीएफ'चे पैसे काढण्यासाठी भरावे लागणारे फॉर्म आणि दिवसांची प्रतीक्षा आता इतिहासजमा होणार आहे. ईपीएफओने 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' सोबत हातमिळवणी केली असून, आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच 'UPI'च्या माध्यमातून पीएफचे पैसे थेट बँक खात्यात वळते करण्याची सुविधा सुरू केली आहे.
फॉर्म भरण्याची कटकट संपणार
सध्याच्या नियमांनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने ५ लाख रुपयांपर्यंतच्या 'ऑनलाइन ॲडव्हान्स क्लेम'साठी अर्ज केला, तरीही ते पैसे बँक खात्यात जमा होण्यासाठी किमान ३ कामाचे दिवस लागतात. जर ही रक्कम ५ लाखांहून अधिक असेल, तर हा कालावधी आणखी वाढतो. मात्र, 'यूपीआय फ्रेमवर्क'च्या अंमलबजावणीनंतर, पीएफ क्लेम मंजूर होताच काही सेकंदात पैसे थेट कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात जमा होतील.
सुरुवात 'BHIM' पासून
ईपीएफओच्या या नवीन सुविधेचा वापर सुरुवातीला केवळ सरकारी भीम यूपीआय ॲपद्वारेच करता येईल. मात्र, ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर येत्या काही दिवसांत Paytm, PhonePe आणि Google Pay यांसारख्या लोकप्रिय खाजगी यूपीआय प्लॅटफॉर्मवरही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पैसे काढण्याची मर्यादा किती?
- या सुविधेचा गैरवापर टाळण्यासाठी आरबीआयच्या यूपीआय नियमांनुसार काही मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत.
- सध्या (जानेवारी २०२६) यूपीआयची दैनंदिन व्यवहार मर्यादा १ लाख रुपये आहे.
- वैद्यकीय उपचार, शिक्षण, विमा, ट्रॅव्हल आणि आयपीओ यांसारख्या विशेष कारणांसाठी ही मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पीएफ धारकांना आपत्कालीन वैद्यकीय कारणासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचा क्लेम यूपीआयद्वारे झटपट मिळवता येईल.
नोकरदारांना काय होणार फायदा?
- आपत्कालीन स्थितीत पैशांसाठी ४-५ दिवस वाट पाहावी लागणार नाही.
- व्यवहार यूपीआयद्वारे होणार असल्याने त्याची ट्रॅकिंग सोपी होईल.
- फॉर्म आणि कागदपत्रांच्या कटकटीतून नोकरदारांची पूर्णपणे सुटका होईल.
