EPFO : महागाईमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांना फेब्रुवारी महिना दिलासा देणारा ठरत आहे. आधी अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंत करकपात मिळाली. लागलीच रिझर्व्ह बँकेने ०.२५ बेसिस पॉइंटने व्याजदर कपात करुन सुखद धक्का दिला. यात आता आणखी एका गुड न्यूजची भर पडणार आहे. ईपीएफओ योजनेचे सदस्य असणाऱ्या नोकरदारवर्गाला आता व्याजदर वाढीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत लोकांना ईपीएफओमध्ये जमा केलेल्या पैशांवर अधिक व्याज मिळेल, अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे. अशा परिस्थितीत सरकार पगारदार वर्गासाठी आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
नोकरदार वर्गाला सामाजिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना सुरू केली आहे. या बचत योजनेत पगाराचा काही भाग गुंतवला जातो. यावर सरकारकडून दरवर्षी निश्चित व्याजदर जाहीर केला जातो. या व्याजदरात सरकार वाढ करण्याची शक्यता आहे. भविष्य निर्वाह निधीशी संबंधित सर्व निर्णय ईपीएफओ घेते. त्यामुळे आता २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ईपीएफओ बोर्डाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत व्याजदर वाढीबाबत संभाव्य निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत किती वेळा व्याज वाढले?
याआधीही सरकारने सलग २ वर्षे ईपीएफओवरील व्याज वाढवले आहे. यापूर्वी, सरकारने २०२२-२३ मध्ये पीएफवरील व्याजदर सुधारित केले करुन ८.१५ टक्के केलं होतं. यानंतर, २०२३-२४ मध्ये ते पुन्हा ८.२५ टक्के करण्यात आले. सध्या लोकांना पीएफवर ८.२५ टक्के व्याज मिळत आहे.
पीएफवरील व्याज किती वाढू शकते?
सरकारने अद्याप ईपीएफओवरील व्याजदरात वाढ करण्याचे कोणतेही संकेत दिले नसले तरी त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळीही सरकार व्याजदरात ०.१० टक्क्यांनी वाढ करू शकते. म्हणजे तुमच्या बचतीवर ८.३५ टक्के व्याजदर लागू होईल.