EPFO Interest Rate : देशातील करोडो पगारदार कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी पीएफ ठेवींवर ८.२५% व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीही हाच दर लागू होता, त्यामुळे यंदा व्याजात कोणतीही कपात न झाल्याने कर्मचाऱ्यांची छोटी बचत सुरक्षितरीत्या वाढत राहणार आहे.
वित्त मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर
'सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज'ने या व्याजदराचा प्रस्ताव तयार करून अंतिम मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवला आहे. मंत्रालयाची मोहोर उमटताच अधिकृत अधिसूचना काढली जाईल आणि त्यानंतर देशभरातील कोट्यवधी सदस्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा होईल.
गेल्या काही वर्षांतील व्याजाचा चढ-उतार
पीएफवरील परतावा नेहमीच स्थिर राहिला नाही. गेल्या काही वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास त्यात चढ-उतार दिसून येतात.
| आर्थिक वर्ष | व्याजदर (%) |
| २०१५-१६ | ८.८०% |
| २०१९-२१ | ८.५०% |
| २०२१-२२ | ८.१०% (चार दशकातील नीचांक) |
| २०२४-२५ | ८.२५% |
| २०२५-२६ | ८.२५% (प्रस्तावित) |
व्याजदर कसा ठरवला जातो?
EPFO कडे जमा झालेली रक्कम सरकारी बाँड्स, सिक्युरिटीज आणि शेअर बाजारात गुंतवली जाते. वर्षभरात या गुंतवणुकीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आढावा घेऊन CBT व्याजदराचा प्रस्ताव तयार करते. ही संपूर्ण प्रक्रिया बाजारपेठेतील परिस्थिती आणि फंड हाऊसेसच्या कामगिरीवर अवलंबून असते.
वाचा - FD गुंतवणूकदारांची चांदी! मुथूट, श्रीरामसह 'या' बँका देतायत जबरदस्त व्याज; पाहा टॉप ५ बँकांची यादी
गुंतवणुकीसाठी आजही 'पीएफ' बेस्ट!
व्याजदरात वाढ झाली नसली तरी, ८.२५% हा दर बँकांच्या मुदत ठेवींच्या तुलनेत आजही सरस आहे. पीएफ ही दीर्घकालीन गुंतवणूक असल्याने यात मिळणाऱ्या चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा कर्मचाऱ्यांना होतो. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या सुरक्षित भविष्यासाठी हा आजही एक सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय ठरत आहे.
