Best saving schemes for Women: राज्य सरकारांबरोबरच केंद्र सरकारही विविध वर्गातील लोकांसाठी विविध योजना राबवते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही महिलांचे हित लक्षात घेऊन अनेक योजना राबवत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारनं २०२३ मध्ये अल्पबचत योजना सुरू केली. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) असं या बचत योजनेचं नाव आहे. यंदा सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात एमएसएससीचा कालावधी वाढवण्याची मागणी होत आहे. खरं तर महिलांसाठी ही एक उत्तम योजना आहे. या योजनेवर महिलांना अधिक व्याज मिळत आहे.
१००० रुपयांपासून खातं उघडू शकता
महिला सन्मान बचत प्रमाणपत्रांतर्गत केवळ महिलांची खाती उघडता येतात, या योजनेत कोणत्याही पुरुषाचं खातं उघडता येत नाही. या योजनेअंतर्गत महिलांना ७.५ टक्के व्याज मिळत आहे, जे महिलांना कोणत्याही फिक्स्ड इन्कम अल्पबचत योजनेवर मिळत नाही. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना २ वर्षात मॅच्युअर होते आणि आपण त्यात जास्तीत जास्त २ लाख रुपये जमा करू शकता. कमीत कमी १००० रुपयांमध्येही ही योजना उघडता येऊ शकते. तुम्ही इच्छित असाल तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत कोणत्याही बँकेत खातं उघडू शकता. याशिवाय पोस्ट ऑफिसमध्ये ही तुम्ही एमएसएससी खातं उघडू शकता.
तर १६ हजार रुपयांचं गॅरंटीड व्याज
जर तुम्ही पुरुष असाल तर या योजनेत तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावानं खातं उघडू शकता. जर तुम्ही या योजनेत फक्त १ लाख रुपये जमा केले तर २ वर्षांनंतर तुमच्या पत्नीला मॅच्युरिटीवर एकूण १,१६,०२२ रुपये मिळतील. ज्यामध्ये केवळ व्याजाद्वारे १६,०२२ रुपये मिळतील. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना पूर्णपणे सुरक्षित असून त्यात कोणत्याही प्रकारचा धोका नाही. या योजनेत तुम्हाला सरकारी गॅरंटीसह निश्चित परतावा मिळतो.