Ambani Family: अंबानी कुटुंबाने फक्त भारतच नाही, तर जगभरातील उद्योगविश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र, या कुटुंबातील काही नातेवाईकांनी व्यवसायाच्या पलीकडे जाऊन वेगळ्या क्षेत्रांतही मोठे यश मिळवले आहे. अशाच व्यक्तींमध्ये सौरभ पटेल यांचे नाव येते. अंबानी कुटुंबाशी नातेसंबंध असूनही, त्यांनी व्यवसायाऐवजी राजकारणात आफली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
व्यवसायापेक्षा राजकारणात वाटचाल
अंबानी कुटुंब हे भारतातील सर्वात श्रीमंत कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक मानले जाते. धीरूभाई अंबानी यांचे पुत्र मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी उद्योगविश्वात मोठे नाव कमावले. त्यांची पुढील पिढीदेखील रिलायन्स समूहात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. मात्र, या कुटुंबाचे जावई सौरभ पटेल यांनी उद्योग क्षेत्राऐवजी राजकारणाचा मार्ग निवडला.
अंबानी कुटुंबाशी कसा आहे नातेसंबंध?
सौरभ पटेल हे नात्याने अंबानी कुटुंबाचे जावई आहेत. त्यांचा विवाह इला अंबानी यांच्याशी झाला असून, त्या रमणिकभाई अंबानी यांच्या कन्या आहेत. रमणिकभाई अंबानी हे धीरूभाई अंबानी यांचे थोरले भाऊ होते. त्यामुळे सौरभ पटेल हे मुकेश आणि अनिल अंबानी यांचे मेहुणे(भाऊजी) ठरतात. सौरभ पटेल यांनी 2014 साली निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या नातेसंबंधाची माहिती स्वतः दिली होती.
गुजरातच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका
सौरभ पटेल भारतीय जनता पक्षाचे नेते असून, गुजरात सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री राहिले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी गुजरातच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. विशेषतः ‘व्हायब्रंट गुजरात’ या जागतिक गुंतवणूक परिषदांच्या यशात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.
संपत्ती आणि ADR अहवाल
ADR (Association for Democratic Reforms) च्या अहवालानुसार, सौरभ पटेल हे देशातील सर्वाधिक संपत्ती असलेल्या मंत्र्यांपैकी एक होते. त्यांची जाहीर केलेली मालमत्ता सुमारे 123 कोटी रुपयांची आहे.
अंबानी साम्राज्याची पायाभरणी
सौरभ पटेल यांचे सासरे रमणिकभाई अंबानी हे Reliance Industriesच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांनी धीरूभाई अंबानी यांच्यासोबत मिळून रिलायन्स समूहाची पायाभरणी केली. रमणिकभाई अंबानी यांचा मुलगा विमल अंबानी यांच्या नावावरुनच रिलायन्स समूहाने प्रसिद्ध ‘विमल’ या वस्त्रोद्योग ब्रँडची सुरुवात केली होती.
