Ambani-Adani: यावर्षी आतापर्यंत कमाईच्या बाबतीत मुकेश अंबानी यांनी सर्व भारतीय अब्जाधीशांना मागे टाकले आहे. तर, देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, कमाईच्या बाबतीत अंबानींनंतर लक्ष्मी मित्तल यांनी दुसरे स्थान पटकावले आहे.
रिलायन्स शेअरची दमदार कामगिरी
2025 मध्ये देशातील सर्वाधिक मूल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या शेअरने जबरदस्त कामगिरी केली आहे. रिलायन्स शेअरमध्ये आतापर्यंत 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. विश्लेषकांच्या मते, रिलायन्समध्ये व्हॅल्यू अनलॉकिंगबाबत सकारात्मक वातावरण, 2026 मध्ये अपेक्षित जिओ प्लॅटफॉर्म्सचा IPO आणि तज्ज्ञांचे सकारात्मक अहवाल यामुळे शेअरला मजबूत पाठबळ मिळत आहे.
मुकेश अंबानींच्या संपत्तीत मोठी वाढ
रिलायन्स शेअरमधील झपाट्याने वाढ झाल्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 15.3 अब्ज डॉलर्सची (सुमारे 1.3 लाख कोटी रुपये) वाढ झाली आहे. यासह त्यांची एकूण नेटवर्थ वाढून 106 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. यामुळेच 2025 मध्ये ते सर्वाधिक कमाई करणारे भारतीय अब्जाधीश बनले आहेत. विशेष म्हणजे, ब्लूमबर्ग यादीतील ते एकमेव भारतीय सेंटिबिलियनेअर आहेत. तसेच, जागतिक क्रमवारीत 18वा क्रमांकावर आहेत.
कमाईत नंबर-2 कोण?
गौतम अदानी हे देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असले, तरी 2025 मध्ये कमाईच्या बाबतीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, लक्ष्मी मित्तल यांनी कमाईत दुसरा क्रमांक पटकावला आहे. यावर्षी त्यांच्या संपत्तीत 11.7 अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून, एकूण नेटवर्थ आता 31.40 अब्ज डॉलर्स झाली आहे.
गौतम अदानी तिसऱ्या क्रमांकावर
2025 मध्ये गौतम अदानी यांच्या संपत्तीत 6.52 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. यासह त्यांची एकूण नेटवर्थ वाढून 85.2 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. दरम्यान, या वर्षी अदानी समूहातील शेअर्सची कामगिरी मिश्र स्वरुपाची राहिली आहे. अदानी पॉवर, अदानी एनर्जी सोल्यूशन्स, अदानी पोर्ट्स - 23 ते 36 टक्के वाढले, तर ACC, AWL Agri Business, अदानी टोटल गॅस, NDTV 13 ते 35 टक्के घसरले.
