RBI maintains reporter status; The decision of unity | रिझर्व्ह बॅँकेने रेपोदर राखला कायम; एकमताचा निर्णय
रिझर्व्ह बॅँकेने रेपोदर राखला कायम; एकमताचा निर्णय

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बॅँकेने गुरुवारी जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणामध्ये रेपो आणि रिव्हर्स रेपोदर कायम राखले आहेत. गेल्या पाच वेळा बॅँकेने रेपोदरामध्ये कपात केली होती. यंदाही रेपो दरात कपात होईल, अशी चर्चा सुरू होती.
पतधोरण बैठकीनंतर रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली. यावेळी रेपोदर कायम राखले आहेत, मात्र भविष्यामध्ये हे दर कमी होऊ शकतील. पतधोरण समितीच्या सहा सदस्यांनी एकमताने व्याजदरामध्ये कपात न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनीही सांगितले.
मागील वेळेला रिझर्व्ह बॅँकेने रेपोदर ५.१५ टक्के तर रिव्हर्स रेपोदर ४.९० टक्क्यांवर आणला होता, तो आगामी दोन महिन्यांसाठी कायम राहणार आहे.
गेल्या पाच वेळेला रिझर्व्ह बॅँकेने रेपोदरामध्ये कपात केली आहे. ही एकूण कपात १.३५ टक्के एवढी होती. रेपोदरातील कपातीचे लाभ बॅँकांनी आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवावेत, अशी रिझर्व्ह बॅँकेची अपेक्षा होती. शक्तिकांत दास यांनी तसे बोलूनही दाखवले होते. मात्र बॅँकांनी प्रत्यक्षामध्ये ०.४४ टक्के दरकपात केली असल्याचेही दास यांनी स्पष्ट केले.
अर्थव्यवस्था गती घेईल
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारने योजलेल्या उपाययोजनांमुळे चांगले निकाल दिसू लागले असून, याबाबत एवढ्यातच भाष्य करणे योग्य ठरणारे नसल्याचे शक्तिकांत दास यांनी पत्रकारांना सांगितले. येत्या काही दिवसांमध्ये बाजारातील मागणी वाढलेली असेल. केंद्र सरकारने अपेक्षित केलेली अर्थसंकल्पीय तूट ही मर्यादेतच राहील, अशी शक्यताही दास यांनी व्यक्त केली.

Web Title: RBI maintains reporter status; The decision of unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.