Petrol-diesel prices hiked by five to six rupees? | पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये पाच ते सहा रुपये वाढ?
पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये पाच ते सहा रुपये वाढ?

नवी दिल्ली : देशात आर्थिक मंदीमुळे वाहनांची मागणी कमी होत असतानाच, आता पेट्रोल व डिझेलचे दर एका लीटरमागे पाच ते सहा रुपयांनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सौदी अरेबियातील कंपनीने तेल उत्पादन कमी केल्याने इंधनाच्या किमती वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सौदी अरेबियातील अरामको या तेल उत्पादक कंपनीच्या दोन प्लांटवर येमेनमधील हुथी या दहशतवादी संघटनेने गेल्या आठवड्यात ड्रोन हल्ला केला होता. त्यामुळे या प्लांटमधील उत्पादन कमी करण्याचा निर्णय अरामको कंपनीने घेतला आहे. हा निर्णय घेताच आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड तेलाच्या किमतीमध्ये १२ टक्के वाढ झाली आहे. त्याचा फटका भारतालाही बसणार आहे.
अरामकोने भारताचा तेलपुरवठा कमी होणार नाही आणि तो कायम ठेवण्यात येईल, असे कळविले आहे. त्यामुळे भारतात पेट्रोलजन्य पदार्थांची टंचाई भासणार नाही, असे पेट्रोलियम मंत्रालयाने सोमवारी सांगितले आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या दरवाढीचा परिणाम भारतात निश्चितच होईल, असे देशातील तेल कंपन्यांचे म्हणणे आहे. अर्थात, त्यांनी आतापर्यंत तसे जाहीर केलेले नाही.
क्रूड तेलाच्या दरात एका दिवसातच प्रति बॅरल १0 डॉलर्सने वाढ झाली आहे. याचा परिणाम देशातील कंपन्यांना जाणवेल आणि ग्राहकांना पेट्रोल व डिझेलसाठी पाच ते सहा रुपये जादा मोजावे लागतील. अर्थात, ही दरवाढ लगेच लागू होईल की त्यास आठवडा वा पंधरवडा लागेल, हे सांगणे अवघड आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
>छोट्या शहरांवर होणार परिणाम
पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्यास, त्यावरील व्हॅट व अन्य करांची रक्कम वाढेल. मात्र, हे कर गृहित धरून दोन्ही इंधनांच्या किमतीत पाच ते सहा रुपयांची वाढ होईल, असा अंदाज आहे.
त्यामुळे पुन्हा इंधनांवर जीएसटी लागू करावा, ही मागणी होण्याची शक्यता आहे.
देशातील अनेक लहान शहरांमध्ये व ग्रामीण भागांमध्ये सीएनजी मिळत नाही. त्यामुळे तेथील लोकांना, तसेच मोठ्या शहरांमधील खासगी वाहनचालकांना दरवाढीचा बोजा सहन करावा लागेल, असे दिसत आहे.


Web Title: Petrol-diesel prices hiked by five to six rupees?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.