Lokmat Money > बिझनेस न्यूज > बिल गेट्सना 'धक्का'! मायक्रोसॉफ्टला मागे टाकत 'ही' कंपनी बनली जगातील नंबर वन!

बिल गेट्सना 'धक्का'! मायक्रोसॉफ्टला मागे टाकत 'ही' कंपनी बनली जगातील नंबर वन!

Nvidia : सेमीकंडक्टर चिप निर्माता कंपनी एनव्हीडियाने बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला मागे टाकलं आहे. कंपनीचे एकूण बाजारमूल्य अंदाजे ३.४५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:58 IST2025-06-04T12:41:49+5:302025-06-04T12:58:21+5:30

Nvidia : सेमीकंडक्टर चिप निर्माता कंपनी एनव्हीडियाने बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला मागे टाकलं आहे. कंपनीचे एकूण बाजारमूल्य अंदाजे ३.४५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे.

Nvidia Overtakes Microsoft Becomes World's Most Valuable Company | बिल गेट्सना 'धक्का'! मायक्रोसॉफ्टला मागे टाकत 'ही' कंपनी बनली जगातील नंबर वन!

बिल गेट्सना 'धक्का'! मायक्रोसॉफ्टला मागे टाकत 'ही' कंपनी बनली जगातील नंबर वन!

Nvidia : एकेकाळी जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांमध्ये बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्टचे नाव आदराने घेतले जायचे. मात्र, तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या युगात आता एक नवा 'राजा' उदयास आला आहे. सेमीकंडक्टर चिप निर्माता कंपनी एनव्हीडियाने (Nvidia) मायक्रोसॉफ्टला मागे टाकत जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनण्याचा मान पटकावला आहे! आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञानातील कंपनीची वाढती पकड तिच्या बाजार मूल्याला नव्या उंचीवर घेऊन जात आहे.

गेल्या मंगळवारी, एनव्हीडियाच्या शेअरमध्ये सुमारे ३.४ टक्क्यांनी वाढ झाली, ज्यामुळे कंपनीचे एकूण बाजारमूल्य तब्बल ३.४५ ट्रिलियन डॉलर्स झाले. तर मायक्रोसॉफ्टचे बाजारमूल्य ३.४४ ट्रिलियन डॉलर्सवर राहिले. हा बदल एआयच्या भविष्यातील महत्त्वाचे स्पष्ट संकेत देतो.

एनव्हीडियाच्या 'एआय चिप्स'ची वाढती मागणी!
एनव्हीडियाने बाजार मूल्याच्या शर्यतीत सर्वांना मागे टाकून अव्वल स्थान मिळवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. कंपनीने यापूर्वी या वर्षी २४ जानेवारी रोजी देखील हे स्थान काही काळासाठी मिळवले होते. त्यानंतर थोडी घसरण झाली असली तरी, आता एआय चिप्सची वाढती मागणी आणि कंपनीच्या महसुलात झालेली प्रचंड वाढ यामुळे, एनव्हीडिया पुन्हा एकदा जगातील सर्वात मूल्यवान कंपनीच्या सिंहासनावर विराजमान झाली आहे.

२७ एप्रिल रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत एनव्हीडियाचा महसूल ४४.१ अब्ज डॉलर्स होता. ही रक्कम मागील तिमाहीपेक्षा १२ टक्के आणि गेल्या वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा तब्बल ६९ टक्के जास्त होती! यामागील मुख्य कारण म्हणजे एआय आणि डेटा सेंटरमध्ये (Data Center) वापरल्या जाणाऱ्या त्यांच्या चिप्सची वाढती मागणी.

एनव्हीडिया केवळ चिप्सच नाही, तर 'एआय' पायाभूत सुविधाही बनवणार!
जागतिक दर आणि कडक व्यापार नियम असूनही एनव्हीडियाच्या H20 चिप्सची मागणी वाढतच राहिली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत केवळ तिच्या H20 उत्पादनांमधून ४.६ अब्ज डॉलर्स कमावले आहेत.

आता एनव्हीडिया केवळ चिप्स बनवत नाहीये, तर आर्टिफिशियल इंटेलिजेंसला सपोर्ट देण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा तयार करण्यातही गुंतली आहे. कंपनी पुढील चार वर्षांत ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत किमतीच्या एआय सिस्टीम तयार करण्याची योजना आखत आहे. या सिस्टीममध्ये एआय सुपरकॉम्प्युटर आणि मोठे डेटा सेंटर समाविष्ट आहेत, जे एआयच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

अमेरिकेत एआय सुपरकॉम्प्युटर बनवणार!
या वर्षी एप्रिलमध्ये आलेल्या बातमीनुसार, एनव्हीडिया पहिल्यांदाच अमेरिकेत त्यांचे एआय सुपरकॉम्प्युटर बनवण्यास सुरुवात करणार आहे. कंपनीने त्यांच्या प्रगत ब्लॅकवेल चिप्सच्या उत्पादनासाठी अ‍ॅरिझोनामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. याव्यतिरिक्त, एनव्हीडिया टेक्सासमध्ये एक भव्य एआय सुपरकॉम्प्युटर सुविधा देखील बांधत आहे, ज्याचे उत्पादन क्षेत्र दहा लाख चौरस फुटांपेक्षा जास्त आहे. या प्रकल्पासाठी एनव्हीडियाने फॉक्सकॉनसोबत भागीदारी देखील केली आहे.

वाचा - सोन्याचे दागिने विकताय? थांबा! 'या' ३ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर नफ्याऐवजी होईल 'तोटा'

थोडक्यात, एनव्हीडियाची ही वाढ केवळ चिप्सच्या मागणीमुळे नाही, तर एआय तंत्रज्ञानाच्या भविष्यातील मोठ्या गरजा पूर्ण करण्याच्या तिच्या दूरदृष्टीमुळे आणि गुंतवणुकीमुळे आहे. यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात एक नवीन पर्व सुरू झाले आहे.
 

Web Title: Nvidia Overtakes Microsoft Becomes World's Most Valuable Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.