Nifty reported new high performance | निफ्टीने नोंदविली नवीन उच्चांकी कामगिरी

निफ्टीने नोंदविली नवीन उच्चांकी कामगिरी

- प्रसाद गो. जोशी
अस्थिर असलेल्या जागतिक राजकारणाच्या परिस्थितीमुळे बुधवारी निर्देशांकाने मोठी गटांगळी घेतली असली, तरी नंतरच्या काळामध्ये बाजारात खरेदीचा उत्साह दिसून आला. सप्ताहामध्ये निफ्टीने नवीन उच्चांकाची केलेली नोंद हे सप्ताहाचे वैशिष्ट्य होय. गेले दोन सप्ताह सातत्याने घसरत असलेल्या शेअर बाजाराला या सप्ताहामध्ये मात्र वाढ बघावयास मिळाली. बुधवारी अमेरिकेने इराणच्या लष्करी अधिकाऱ्याची हत्या केल्यानंतर जगभरामध्ये युद्धाची भीती निर्माण झाली होती. त्याचा परिणाम भारतातील शेअर बाजारांवरही दिसून आला. या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली. या दोन्ही निर्देशांकांनी एका दिवसातील वर्षामधील सर्वांत मोठी घसरण या दिवशी अनुभवली.
यानंतर मात्र बाजारामध्ये सकारात्मक वातावरण दिसून आले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेले मोठे पॅकेज आणि अर्थसंकल्पामध्ये काही मोठे निर्णय जाहीर करण्याचे दिलेले संकेत यामुळे बाजारामध्ये वाढ होताना दिसून आली. या दरम्यानच निफ्टी निर्देशांकाने १२,३११.२० अंश असा नवीन सार्वकालिक उच्चांक नोंदविला. जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर परकीय वित्तसंस्थांनी सप्ताहामध्ये ११५४.७५ कोटी रुपयांची विक्री केली, तर देशांतर्गत वित्तसंस्थांनी १२०३.३७ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे.

Web Title: Nifty reported new high performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.