Zepto Reverse Flip: क्विक कॉमर्स फर्म झेप्टोनं आपल्या प्रस्तावित इनिशिअल पब्लिक ऑफरिंगपूर्वी (आयपीओ) सिंगापूर ते भारत असा भारतीय कंपनी बनण्यासाठीचं 'रिव्हर्स फ्लिप' पूर्ण केलंय. रिव्हर्स फ्लिप प्रक्रियेचा वापर परदेशातील स्टार्टअप्स भारतात आपलं स्थान बदलण्यासाठी आणि भारतीय स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्ट होण्याची इच्छा दर्शविण्यासाठी करतात. झेप्टोचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आदित पालिचा यांनी रिव्हर्स फ्लिप प्रक्रिया कशी पूर्ण केली याबद्दल आपल्या लिंक्डइन पोस्टद्वारे माहिती दिली आहे.
"आम्हाला सिंगापूरमधील न्यायालयं आणि भारतातील एनसीएलटीकडून आमचं विलीनीकरण पूर्ण करण्यासाठी आणि भारतीय मूळ कंपनी बनण्यासाठी औपचारिक मान्यता मिळाली आहे," असं आदित पालिचा म्हणाले. "भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमसाठी हा एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे आणि भारतीय भांडवली बाजाराच्या तरलता आणि दीर्घकालीन विश्वास दर्शविणारा टर्निंग पॉईंट आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
कंपनीचं मूळ स्थान भारतात आणण्याचं झेप्टोचं पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे कारण कंपनी आयपीओद्वारे भारतीय बाजारातून निधी उभारण्याच्या विचारात आहे. मुंबईच्या या कंपनीला गेल्या आर्थिक वर्षात ४,४५४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता, जो मागील आर्थिक वर्षातील २,०२५ कोटी रुपयांच्या दुप्पट होता.