इंटरनेट आणि स्मार्टफोनद्वारे कमाई आता केवळ नोकरी आणि बिझनेस पुरतं मर्यादित राहिलं नाही. डिजिटल युगात पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. विशेष म्हणजे या नव्या पर्यायामुळे कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळतेय त्याचसोबत देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. यूट्यूबही कमाईचं नवं साधन बनून समोर आलं आहे. ऑक्सफोर्ड इकोनॉमिक्सनं गुरुवारी एक रिपोर्ट जारी केला.
या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, यूट्यूब क्रिएटर्सनं व्हिडीओ बनवून २०२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत तब्बल ६८०० कोटींचे योगदान दिले. यूट्यूबर्सनं पूर्ण वेळ नोकऱ्यांच्या तुलनेत जीडीपीला हातभार लावण्यास मदत केली. ९२ टक्के छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना यूट्यूबच्या माध्यमातून जगभरातील लोकांपर्यंत पोहचण्यास मदत मिळाली. भारतात यूट्यूबच्या अर्थव्यवस्थेतील प्रगती पाहून अनेकजण खुश झालेत. आर्थिक कमाईचं नवं माध्यम म्हणून यूट्यूबकडे अनेकांचा कल वाढला आहे. कालांतराने अर्थव्यवस्थेवर याचा प्रभाव आणि गती वाढण्यास मदत होणार आहे.
लाखो रुपये कमाई
रिपोर्टनुसार, ४० हजारांहून अधिक यूट्यूब चॅनेलवर १ लाखांहून अधिक सब्सक्राईबर्स आहे. प्रत्येक वर्षी ही संख्या ४५ टक्क्यांनी वाढत आहे. देशात कमीत कमी सहा अंकी अथवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्या यूट्यूब चॅनेलची संख्या दरवर्षी ६० टक्क्यांनी वाढत आहे. मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार, देशात यूट्यूबचा वापर करणाऱ्यांची संख्या ४४.८ कोटी होती. ५३ कोटी लोकं व्हॉट्सअप आणि ४१ कोटी फेसबुकचा वापर करतात. इन्स्टाग्राम युजर्सची संख्या २१ कोटी तर १.७५ कोटी ट्विटरचा वापर करतात.
व्यवसाय वाढवण्यास मिळतेय मदत
ऑक्सफोर्ड इकोनॉमिक्सच्या सीईओ एड्रियन कपूर म्हणाल्या की, यूट्यूब भारतीय उत्पादकांना त्यांचं लक्ष्य गाठण्यासाठी आणि व्यवसायात वाढ होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका निभावत आहे. यूट्यूबवरील व्हिडीओ जगातील अनेक देशांपर्यंत पोहचतात. भारतात ८० टक्क्यांहून अधिक क्रिएटर्सचं म्हणणं आहे की, यूट्यूबसारख्या व्यासपीठामुळे व्यावसायिकांना त्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सकारात्मक प्रभाव पडला. यूट्यूबच्या माध्यमातून कमाई करून देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा हातभार लागत असल्याचं ऑक्सफोर्डच्या रिपोर्टमधून समोर आलं आहे.
