चांगल्या परफॉर्मन्ससाठी अधिक पैसा खर्च करावा लागतो, अशी अनेक कंपन्यांची धारणा आहे. मात्र, एका नव्या आतरराष्ट्रीय संशोधनाने हा समज मोडीत निघाल्याचे दिसते. ज्या टीममध्ये महिलांचा सहभाग अधिक असतो, तेथे चुका कमी होतात आणि एकूण खर्चही कमी होतो, असे या संशोधनातून समोर आले आहे.
५००० कंपन्यांचा अभ्यास -
अमेरिकन संशोधकांचे हे अध्ययन 'रिव्ह्यू ऑफ अकाउंटिंग स्टडीज' या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. आ अभ्यासात १० वर्षांच्या कालावधीतील सुमारे ५००० कंपन्यांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. यात, ऑडीट टीममध्ये महिलांची संख्या अधिक असल्यास केवळ चांगला परिणामच येत नाही, तर कामही कमी खर्चात पूर्ण होते, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. ऑडिट टीम प्रामुख्याने कंपनीच्या हिशोबाची आणि पारदर्शकतेची तपासणी करत असते.
९ टक्के चुका कमी होतात -
संशोधनानुसार, महिलांची संख्या अधिक असलेल्या टीममध्ये कामातील चुकांचे प्रमाण सुमारे ९ टक्क्यांनी कमी होते. ऑडिट फीमध्ये २ टक्क्यांपर्यंत घट दिसून येते. विशेष म्हणजे, हा सकारात्मक बदल केवळ वरिष्ठ पदांवरील महिलांमुळेच होतो असे नाही, तर स्टाफ आणि मिड-लेवलवर महिलांची संख्या अधिक असल्यामुळेही होतो. डेटा तपासणे, जोखीम ओळखणे आणि क्लायंटशी संवाद साधणे यांत या स्तरावरील महिलांची भूमिका मोलाची ठरते.
महिलांचा प्रभाव आणि कामाची गुणवत्ता महिलांमध्ये उपजत असलेले बारकाव्यांकडे लक्ष देण्याचे कौशल्य, जोखीम ओळखण्याची क्षमता, सांघिक कार्य आणि नैतिकतेला दिलेले महत्त्व यामुळे ऑडिटसारख्या कामात गुणवत्ता येते. मात्र, केवळ महिलांची नियुक्ती पुरेशी नसून कार्यालयातील पोषक वातावरण, त्यांना मिळणारा सन्मान आणि पदोन्नतीच्या संधी, या गोष्टीही महत्वाच्या आहेत.
धोरणात्मक व्यावसायिक निर्णय -
जर अनुभवी महिला कर्मचाऱ्याने अर्ध्यावरच काम सोडले, तर कामाचा दर्जा घसरतो आणि खर्चही वाढू शकतो. यामुळे महिलांना टीममध्ये स्थान देणे हा केवळ सामाजिक दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय नसून, तो एक धोरणात्मक व्यावसायिक निर्णयही आहे. ज्यामुळे कंपनीचा नफा आणि गुणवत्ताही वाढू शकते.
